१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला . परकीय सत्तेच्या विरोधात लढून स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करणारे भारतातील ते एकमेव राजे होते . बाकी इतर सर्व राजे हे परकियांचे मांडलिक म्हणूनच राहिलेले आहेत . ते परकीय सत्तेच्या विरोधात जसे लढले तसेच इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात सुद्धा लढले . प्रस्थापित व्यवस्था नेहमी त्यांच्या विरोधात राहिलेली आहे . शिवाजींना राज्यकारभार करू न देण्यापासून तर थेट त्यांचा जीव घेण्यापर्यंत इथलेच लोक कार्यरत होते म्हणून कृष्णाजी भास्कर कुळकर्णी जेंव्हा त्यांना मारून टाकण्या करिता तलवार घेऊन पुढं सरसावला तेंव्हा शिवाजी महाराजांनी त्यालाच ठार केले.
शिवाजी महाराज एक मराठा असल्याने त्यांना इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने प्रचंड त्रास दिला तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त त्रास पुढं संभाजी महाराजांना दिला . असे असतांना सुद्धा मराठा समाज ब्राम्हणी व्यवस्थेचा कधीच विरोधक न राहता त्याव्यवस्थेच्या बाजूने लढत राहिला आहे त्याचा परिणाम पेशवाई येण्यात व ती स्थिरस्थावर होण्यात झाला . संभाजी महाराजांच्या निधना नंतर हा समाज तसेच सारा महाराष्ट्र शिवाजी महाराजांना जवळ जवळ विसरलाच. त्यांची समाधी सुद्धा पूर्ण दुर्लक्षित झाली . त्या समाधिकडं कोणी फिरकत सुद्धा नसल्याने ती भग्न झाली , काटेरी झाडांनी वेढली गेली.
या देशातील महान समाजोद्धारक महात्मा जोतिबा फुले हे सन १८८० ला पुण्या पासून १०० की. मी. दूर असलेल्या रायगड किल्यावर गेले व त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली . समाधी लगतची काटेरी झाडं , झुडपं तोडून काढली , रस्ता तयार केला , समाधीची डागडुजी केली . हे करीत असतांना रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पुजाऱ्याने त्यांना असे करण्यास मनाई केली , फुले यांनी त्यास विरोध केला तेंव्हा त्या पुजाऱ्याने त्यांना मारहाण केली. समाधीचा शोध लाऊन महात्मा फुले पुणे येथील आपल्या निवासी आले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सारसबाग जवळील हिराबाग येथे काही सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली . या बैठकीत त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधी विषयी माहिती दिली . समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे व आपण त्यांची जयंती साजरी केली पाहिजे असे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले . याच बैठकीत सखाराम नीलकंठ चाफळकर व गंगाराम भाऊ म्हस्के यांची सुद्धा भाषणे झाली त्यांनी फुलेंच्या विचारांना पाठींबा दिला . त्याकरिता त्याच बैठकीत पैशाची जुळवा जुळव केली असता एकूण २७ रुपये गोळा झाले . या पैशांतून समाधीस्थळी साफ – सफाई , डागडुजी करण्यात आली व १८८१ मध्ये शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली . संपूर्ण भारतभरात शिवाजी महाराजांची ही पहिली जयंती ठरली . भारतातील पहिले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी शिवजयंती व्यापक स्वरूपात सुरू केली . लालबाग , परळ या भागात गिरणी कामगारांना त्यांनी शिवाजी महाराजांचे महत्व पटवून दिले त्यामुळे प्रत्येक कामगार वस्ती मध्ये शिवजयंती साजरी केली जाऊ लागली .
१८९० ला महात्मा फुले यांचे निधन झाल्यानंतर १८९३ ला टिळकांनी शिवजयंती साजरी केली त्याकरिता मोठा फंड उभा केला . ४ जून १९०३ मध्ये सखाराम गणेश देऊसकर या महाराष्ट्रीयन माणसाने बंगाल ( कलकत्ता ) मध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली . महाराष्ट्राच्या बाहेर व बंगाल मध्ये साजरी झालेली शिवाजी महाराजांची ही पहिली जयंती होय . या जयंतीला महाराष्ट्रातून बाळ गंगाधर टिळक , बाळकृष्ण मुंजे व काही पुढारी आमंत्रित केले होते . बिपिनचंद्र पाल हे सुध्दा या जयंतीला आले होते . याच देऊसकरांनी भारताला सर्वप्रथम ‘ स्वराज्य ‘ हा शब्द दिला आहे तसेच त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे कडून ‘ शिवाजी उत्सव ‘ ही कविता लिहून घेतली आहे . या जयंती समारंभात टिळक , मुंजे , पाल व अन्य लोकांची भाषणे झाली . टिळकांनी मराठा समाजाला एकजूट होऊन ब्रिटिशांना विरोध करण्याचे आवाहन केले तर देऊसकर यांनी शिवाजी महाराजांची अर्थनिती या विषयी विचार मांडले .
१९०५ मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा झाली असता या फाळणीला विरोध करण्या करिता बंगालमध्ये जो विरोध करण्यात आला त्यात शिवाजी महाराज यांच्या नावाचा व कार्याचा मोठा वापर करण्यात आला त्याच वेळेस महाराष्ट्रात टिळकांनी शिवजयंतीचा वापर बंगालच्या फाळणी विरोधात केला त्याचा परिणाम फाळणी रद्द करण्यात झाला . पुढं शिवजयंतीच्या व शिवाजी महाराजांच्या विचारातून ब्रिटिशांना विरोध करणारी व्यापक चळवळ त्यांनी उभी केली . यातून शिवजयंती व्यापक प्रमाणात साजरी होऊ लागली .
३ मे १९२७ ला बदलापूर ( मुंबई ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती साजरी करण्यात आली . शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीत १५००० लोक सहभागी झाल्याची नोंद करण्यात आली आहे . या नंतरही बाबासाहेबांना शिवजयंती निमित्त निमंत्रित केले गेले आहे . बाबासाहेबांनी त्यांच्या काही भाषणांमध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. महात्मा फुले यांनी पुण्यापासून सुरू केलेली शिवजयंती आज भारतभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे . कदाचित फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली नसती , त्यांच्यावर पोवाडा रचला नसता, शिवजयंती साजरी केली नसती तर आजही कदाचित लोकांना शिवाजी महाराज कळले नसते . आजही बहुतांश शिवाजी महाराज हे विद्रूप स्वरूपात मांडले जात आहेत , त्यांचा विकृत इतिहास लिहिला जात आहे . तेंव्हा आम्हाला शिवाजी महाराज कळलेच असते तर सत्यांशापासून कोसोदूर असलेले शिवाजी महाराज कळले असते. आज शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व समस्त जनतेस हार्दिक शुभेछा .
( टीप : बऱ्याच पुस्तकांमध्ये समाधीचा शोध १८६९ व पाहिली शिवजयंती १८७० दर्शविले आहे . हरी नरके यांनी १८८० व १८८१ हे वर्ष दर्शविलेले आहे .)









