मागील काही दशकांपासून खासगीकरण, कंत्राटीकरणाचा रेटा वाढत चालला असताना दुसरीकडे सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी काही जागा निघाल्या तरी त्यासाठी लाखो अर्ज दाखल होतात.
मात्र, या स्पर्धा परीक्षांच्या शुल्काच्या माध्यमातून सरकार, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या कमाई करत असल्याची चर्चा सुरू असते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हाच मुद्दा विधानसभेत उचलल्याने परीक्षा शुल्काचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बुधवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विविध मुद्यांवर भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात स्पर्धा परीक्षांच्या शुल्काचा मुद्दा उपस्थित केला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) परीक्षा शुल्क म्हणून 100 रुपये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) 350 रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परीक्षांसाठी केवळ 600 रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी 900 ते एक हजार रुपये शुल्क का आकारते, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय? असा उद्गविन सवालही त्यांनी केला.
#UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत… pic.twitter.com/3TrRmMSSx2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 26, 2023
रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला नेटिझन्सकडून प्रतिसाद मिळाला. हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आभार मानताना एका युजरने आमच्या आईवडिलांच्या कष्टाने कमावलेल्या पैश्याची लुट करून खासगी कंपन्यांचे खिसे भरले जात असल्याचा आरोप केला. परीक्षा शुल्काचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे एका युजरने म्हटले.
4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, सरकारच्या तिजोरीत 127 कोटी
सरकारने काढलेल्या तलाठी भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमवायला निघाले आहेत. कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. तलाठी पदाच्या परीक्षेसाठी पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केला आहे.
4 वर्षानंतर राज्यात तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त लागलाय. सरकारने 4644 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली. 26 जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. 23 जुलै पर्यंत राज्यातील तब्बल 13 लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. 23 जुलैपर्यंत शासनाकडे 12 लाख 77 हजार 100अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल 127 कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले