१०९ आंदोलकांना कोठडी; सखोल चौकशीसाठी सदावर्तेचा ताबा दोन दिवस पोलिसांकडे 

0
211

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील एसटी कामगारांच्या आंदोलनप्रकरणी त्यांचे वकील गुणरतन सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर उर्वरीत १०९ आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलिसांकडे आरोपींविरोधात सकृतदर्शनी सक्षम पुरावे आहेत. त्यामुळे तपासासाठी त्यांना वेळ मिळावा, यासाठी कोठडी सुनावण्यात आल्याचे न्यायालयाने सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केले. दरम्यान, हे आंदोलन पूर्व नियोजित कटाचा भाग असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आंदोलन करणाऱ्या सर्व आरोपींना शनिवारी सुट्टीकालीन न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी सरकारच्या वतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलिसांच्या बाजूने युक्तिवाद केला, तर सदावर्ते यांची बाजू वरिष्ठ वकील महेश वासवानी यांनी मांडली. अ‍ॅड्. घरत यांनी आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सदावर्ते यांनीच कामगारांना पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी चिथावणी दिली. हे एक मोठे कारस्थान असून त्यामागील शक्ती किंवा व्यक्ती कोण आहे, याची माहिती घेण्यासाठी, सदावर्ते यांच्यासह अन्य आरोपींच्या चौकशीसाठी त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड्. घरत यांनी केली. त्यावर न्यायाधीशांनी ‘‘इतक्या लोकांचा तपास १४ दिवसांत शक्य आहे का?’’, अशी विचारणा केली.

संपावरील एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलला कामावर रुजू व्हावे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. पण त्यापूर्वीच हा प्रकार घडला. सदावर्ते यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्याबाबतीत त्यांनी वारंवार वक्तव्ये केली होती. बारामतीला जाण्याचा आरोपींचा कट होता, असे सरकारी वकील घरत यांनी न्यायालयास सांगितले. गरीब एसटी कर्मचाऱ्याना चिथावण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात दोन पोलीस जखमी झाले, एक जण गंभीर असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

सदावर्ते यांच्यातर्फे अ‍ॅड्. महेश वासवानी यांनी सदावर्ते यांची अटक चुकीची असल्याचे सांगितले. सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका केली. तसेच ६०० कोटींच्या एका प्रकरणात पाटील यांनी नुकताच जबाब दिला आहे. अनिल देशमुख प्रकरणातही पाटील यांनी तक्रार केली होती. त्याबद्दल सदावर्ते यांनी युक्तिवाद केला होता. त्यामुळे त्यांच्याशी नेहमी गैरवर्तन केले जात होते. गुन्हा दाखल करताना अनेक गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. बारामतीला जाऊन आंदोलन करणार असे ते बोलले होते, घरात घुसून असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला नाही, असा दावा वासवानी यांनी केला.

तीन तासांच्या युक्तिवादानंतर, महानगर दंडाधिकारी कैलास सावंत यांनी सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासात आणखी काही बाबी उजेडात आल्या तर त्यानुसार, पुढील कोठडीचा विचार करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले. एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने वकील संदीप गायकवाड यांनी युक्तिवाद केला. एसटी कर्मचाऱ्यांचा उद्देश न्यायालयाने समजून घेतला पाहिजे. अटक करण्यात आलेले एसटी कर्मचारी आहेत. ते आंदोलक आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत. गेल्या पाच महिन्यांपासून घरदार सोडून ते आंदोलन करीत आहेत, असे गायकवाड यांनी न्यायालयाला सांगितले आणि त्यांना जामीन देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी आरोपी पुन्हा असे कृत्य करण्याची भीती व्यक्त करताच न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते यांनी पोलिसांवर आरोप केले. ताब्यात घेताना पोलिसांनी गैरवर्तन आणि बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी न्यायालयात केला. माझ्या हाताला दुखापत झाली असून चष्माही फुटल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायाधीशांनी स्वत: सदावर्ते यांच्या आरोपाबाबत खातरजमा केली आणि त्यांच्या वैद्यकीय तपासणीची गरज नाही असे स्पष्ट केले. मात्र, त्यांना आवश्यक औषधे देण्याचे आदेशही पोलिसांना दिले.

पोलिसांचा युक्तिवाद

अटकेतील आंदोलकांपैकी अनेकांनी खोटी नावे सांगितली आहेत. पत्तेही चुकीचे दिले आहेत. त्यांची खरी नावे आणि पत्ते शोधून काढायचे आहेत. आंदोलकांमध्ये एसटी कर्मचारी होते की बाहेरचे कोणी होते, याचा पोलीस तपास करायचा आहे, त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देणे आवश्यक आहे. सदावर्ते यांचा दावा : सदावर्ते यांची अटक चुकीची आहे. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. अनिल देशमुख प्रकरणातही पाटील यांनी तक्रार केली होती. बारामतीला जाऊन आंदोलन करणार असे सदावर्ते बोलले होते, घरात घुसून असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला नाही.

सीएसएमटी’ स्थानकावर ठिय्या

कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर आझाद मैदानात धरणे देऊन बसलेल्या संपकऱ्यांना पोलिसांनी तेथून बाहेर काढले. परंतु तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शनिवारी पहाटेपासून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात सहा तास ठिय्या आंदोलन केले.

गृहमंत्र्यांचा इशारा.. विलीनीकरणाची मागण

वगळून एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर सर्व मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. उच्च न्यायालयाने तसा निर्णयही दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता शांतता राखावी, टोकाची भूमिका घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी दिला.

Spread the love