१९३० , १९३१ व १९३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत भारतीयांना विशेष राजकीय अधिकार देण्याबाबत झालेल्या चर्चेअंती भारत अधिनियम कायदा १९३५ हा कायदा १९३५ मध्ये मंजूर करण्यात आला . या कायद्याला काँग्रेस , मुस्लिम लीग यांनी कडाडून विरोध केला . मात्र १९३७ मध्ये याच कायद्याच्या आधारे भारतातील सर्व १२ प्रांतांमध्ये निवडणुका घेण्याचे इंग्रजांनी जाहीर केले तेंव्हा हेच काँग्रेस व मुस्लिम लीग हे पक्ष निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्यात व जास्तीतजास्त जागा निवडून आणण्यात सर्वात पुढं राहिले . या काळात किमान ६० पक्ष अस्तित्वात होते . मुस्लिम लीग स्वतःला मुस्लिमांचा पक्ष मानत असला तरी सर्वातजास्त पक्ष मुस्लिमांचे होते .किमान १५ मुस्लिम पक्ष यात सक्रिय झाले . काही प्रमाणात त्यांचे प्रतिनिधी निवडून सुद्धा आले .
काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने ब्राम्हणांचा पक्ष होता व तो भांडवलदार , जमीनदार यांच्या हितासाठी लढत होता मात्र तो स्वतःला संपूर्ण हिंदूंचा पक्ष म्हणवून घेत होता .भारतातील बहुतांश हिंदू हे भावनिक पातळीवर काँगेस सोबत होती , त्यांना राजकीय हिताची , विचारधारेची , अधिकार , कर्तव्ये याची उमज नव्हती .मात्र हिंदू धर्माच्या नावावर हिंदू महा सभा हा पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. हिंदूंचे सुद्धा काही पक्ष होते . अस्पृश्य समाज कोणत्याच पक्षाच्या अजेंड्यावर नव्हता व त्याचा स्वतंत्र कोणताच पक्ष नव्हता . संपूर्ण भारतभरात काँगेस पक्ष अत्यंत प्रभावशाली होता . राजकीय स्वातंत्र्या करिता राष्ट्रीय पातळीवर तो लढत होता तेंव्हा १९३७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक यश मिळेल हे निर्विवाद होते . हिंदूंच्या हिताचा पक्ष काँग्रेस तर मुस्लिमांच्या हिताचा पक्ष मुस्लिम लीग ही ओळख मात्र या पक्षांची देशभरात झालेली होती .
सध्याचे राजकीय वातावरण पाहता काँग्रेसला शह देणारा पक्ष नसल्याने देशात या पक्षाची हुकूमशाही निर्माण होऊ शकते , अस्पृश्य , कामगार , शेतकरी , महिला , बहुजन समाज यांना न्याय मिळवून देण्या करिता व स्वतंत्र विरोधी पक्ष निर्माण करण्या करिता एका नव्या पक्षाची आवश्यकता बाबासाहेबांना वाटली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ रोजी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात स्वतंत्र मजूर पक्षाची भूमिका प्रसिद्ध केली व याच दिवशी स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली . त्यांनी त्यांचे लक्ष मुंबई प्रांतावर केंद्रित केले. शेतकरी , शेतमजूर , कामगार , अस्पृश्य , महिला , बहुजन समाज यांची एकजूट करण्याचा , त्यांचेत १९३७ च्या निवडणुकीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला . स्वतंत्र मजूर पक्षाचे महत्व विषद करून याच पक्षाला आपण निवडून द्यावे असे वेळोवेळी आवाहन केले .
१९३७ मध्ये भारतातील संपूर्ण १२ प्रांतांतील एकूण १५८६ जागांकरीता निवडणूक जाहीर झाली . यात मुंबई प्रांतात एकूण १७५ जागां करिता ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी १९३७ रोजी मतदान घेण्यात येत असल्याचे जाहीर झाले . १७ फेब्रुवारी १९३७ ही निकालाची तारीख होती. मुंबई प्रांताच्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्ष , काँग्रेस , मुस्लिम लीग , ब्राम्हणेतर पक्ष , लोकशाही स्वराज्य पक्ष , खोटी सभा , काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष , हिंदू महासभा व अन्य काही पक्ष पूर्ण ताकदीने उतरली . यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे १५ उमेदवार उभे केले . बाबासाहेबांच्या या भूमिकेने मुंबई प्रांताचे राजकीय ध्रुवीकरण झाले , काँग्रस पक्षाला आपली रणनीती ठरविताना मोठी कसरत करावी लागली . असे असले तरी आपणच सत्तेवर येऊ असे याचा आत्मविश्वास काँग्रेसला होता . सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसने बाबासाहेबांचे चरित्र हनन करण्याचा सुद्धा प्रयत्न केल.
आपल्या उमेदवारांच्या प्रचारा करिता बाबासाहेबांनी अतिशय मेहनत घेतली . जिथं जिथं उमेदवार उभे केले होते त्या प्रत्येक मतदारसंघात त्यांनी प्रचार सभा घेतल्या. स्वतः बाबासाहेब मुंबई ( भायखळा ) येथून निवडणुकीला उभे राहिले. मतपत्रिकेतील त्यांचा अनुक्रम क्रमांक ३ होता व निवडणूक चिन्ह माणूस होते . या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध क्रिकेटपटू बाळू बाबाजी पालवणकर यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुध्द उभे केले . पांडुरंग नथुजी राजभोज , बाळकृष्ण देवरुखकर , जिणाभाई जोशी , केशव जोगळेकर , मंचरशा गिल्डर हे अन्य उमेदवार होते . मतांची विभागणी करण्याकरिता राजभोज व देवरुखकर यांना काँग्रेसने अंतर्गत मदत केली . मात्र अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत बाबासाहेबांचा विजय झाला .
दिनांक १७ फेब्रुवारी १९३७ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाला घवघवीत यश मिळाले . त्यांचे १३ उमेदवार निवडून आले. काँग्रेस ८५ , मुस्लिम लीग १८ , ब्राम्हणेतर पक्ष १० अपक्ष ४९ जागांवर विजयी झाले . स्वतंत्र मजूर पक्षाच्या या अभूतपूर्व यशाने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले . इतरांच्या मदतीने त्यांना सरकार बनवावे लागले . मुंबई प्रांतात निवडून आलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या आमदारांची संख्या लक्षात घेता राज्यपाल नियुक्त सभासदांमध्ये पुरुषोत्तम सोलंकी व एस. जी. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली .
अत्यंत कमी कालावधीत एवढ्या मोठ्यासंख्येने उमेदवार निवडून आणून बाबासाहेबांनी नवा इतिहास रचला . बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत वेळोवेळी मांडलेल्या भूमिकेतून भारतभरात अस्पृश्य समाजाच्या वाट्याला १५१ जागा आल्या . वेगवेगळ्या प्रांतात अस्पृश्य समाज प्रथमच आमदार झाला तो भलेही वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आला असेल पण तो बाबासाहेबांच्या व स्वतंत्र मजूर पक्षाच्या विचारधारेतून , संघर्षातून आमदार झाला तेंव्हा त्यांचे यश हे स्वतंत्र मजूर पक्षाचेच यश आहे असे म्हटले तर संयुक्तिकच ठरेल . हजारो वर्षाच्या गुलामगिरी नंतर या भारतात प्रथमच १५१ अस्पृश्य आमदार झाले ही क्रांती बाबासाहेबांमुळे झाली . काँगेस तर गोलमेज परिषदे बाबत उदासीन होती , काही प्रसंगी तिने यावर बहिष्कार टाकला तर ज्या कायद्याच्या आधारे त्यांचे भारतभरात ७०६ आमदार झाले त्या कायद्याच्या विरोधात त्यांनी आग्रही भूमिका घेतली.










