जळगाव -: श्रावण सोमवारच्या पहाटे शहराच्या बेंडाळे चौकाजवळ एका २६ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची असं मृत तरुणाचं नाव असून, तो रामेश्वर कॉलनी येथे राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीत राहणारा विशाल मोची हा सोलर पॅनेल बसवण्याचं काम करत होता. पुष्पालता बेंडाळे चौकाजवळील एमएसईबी कार्यालयाजवळ पहाटे ३ च्या सुमारास त्याचा काही तरुणांशी वाद झाला. वादात अज्ञात ६ ते ७ हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने ६ वार केले.
गंभीर जखमी झाल्याने विशाल जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मयत विशाल मोची याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.