सौदीत सूर्य कोपला! उष्णतेमुळे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू

0
12

सौदी अरब येथे प्रचंड उष्णता वाढली आहे. तापमान 52 डिग्रीपार गेले आहे. सौदीतील मक्का येथे हजसाठी आलेल्या 550 यात्रेकरूंचा एकाच दिवसात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 12 जून ते 19 जून या कालावधीत आतापर्यंत एकूण 577 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू अतिउष्णतेमुळे झाले आहेत. मृतांमध्ये 323 नागरिक इजिप्शियन आहेत, तर 60 जॉर्डनचे आहेत.

याशिवाय इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे. मागील वर्षी हजला गेलेल्या 240 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश इंडोनेशियातील होते. सौदीने सर्व प्रवाशांना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांना सतत पाणी पिण्यास आणि सूर्यप्रकाश टाळण्यास सांगितले जात आहे. अराफात पर्वताच्या उपासनेसह बहुतेक हज विधी दिवसा केले जातात. यासाठी यात्रेकरूंना बराच वेळ बाहेर उन्हात राहावे लागते. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवाला लागला आहे. या वर्षी सुमारे 18 लाख यात्रेकरू हजसाठी दाखल झाले आहेत. यापैकी 16 लाख लोक इतर देशांतील आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये इजिप्शियन यात्रेकरूंची संख्या जास्त आहे, कारण त्यांच्यापैकी अनेकांनी हजसाठी नोंदणी केली नव्हती.

दोन हजार यात्रेकरूंवर उपचार सुरू

बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी सौदी अधिकाऱयांच्या सहकार्याने ऑपरेशन करत आहेत, असे इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. उष्णतेमुळे आजारी पडलेल्या जवळपास दोन हजार यात्रेकरूंवर उपचार केले जात आहेत. 17 जून रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीमध्ये तापमान 51.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सौदी अरबमधील मक्का येथे हवामान बदलाचा खोलवर परिणाम होत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

Spread the love