जळगाव -: पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाला आहे. तिसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात ६३ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ८० कोटी ४२ लाख व देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी असा एकूण सुमारे ८५ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जळगाव तालुक्यातील कुसुंबा ते धानवड तांडा रस्ता, रामदेववाडी ते कुऱ्हाडदे रस्ता, जवखेडा ते सुभाषवाडी रस्ता, डोमगाव ते बोरणार रस्ता,कानळदा ते विदगाव रस्ता, आसोदा ते नांद्रा खुर्द तालुका बोर्डर पर्यंत रस्ता, सुजदे ते भोलाणे तालुका बोर्डरपर्यंत रस्ता व धरणगाव तालुक्यातील काही रस्त्यासाठी एकूण ८० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात १५ रस्त्यांच्या ६३ किमी रस्त्यांसाठी ८० कोटी ४२ लाख ४६ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी २८ लाख एकूण सुमारे ८५ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
”मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ग्रामीण भागातील रस्ते खऱ्या अर्थाने दर्जेदार होत आहे. प्रत्येक किलोमीटरसाठी १ कोटीपेक्षाही जास्त निधीची तरतूद असून, मक्तेदारावर पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या योजनेत रस्त्यांचे काम दर्जेदार होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामीण भागासाठी वरदान ठरत आहे.”- गुलाबराव पाटील, पालकमंत्री