आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांचा तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

0
38

मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर आमदार संजय शिरसाट यांची अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी अंधारे यांच्याबाबत अश्लील वक्तव्य केले होते. त्याविरोधात आता सुषमा अंधारे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सकाळी 11.30 वाजता पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात सुषमा अंधारे यांच्यावतीने हा दावा दाखल करण्यात आला आहे. संजय शिरसाट यांच्यावर केवळ तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

महिला आयोगाने शिरसाट यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. जोपर्यंत शिरसाटांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. आयोगाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून शिरसाट यांचे व्हिडीओ मागवले असून, त्यांचे वक्तव्य तपासून पुढचे निर्देश देण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

आमदार शिरसाट यांच्याकडून महिलांविरोधात सतत बेताल वक्तव्य होत आहे. त्याविरोधात राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला जावा आणि शिरसाठ यांच्या विरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयामध्ये दाखल करणार, असे अंधारे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यामागे एकच हेतू आहे. तो म्हणजे, महिलांबद्दल शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार, आमदार गुलाबराव पाटील यांच्यासारखे नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. या नेत्यांना चाप बसावा, असेही अंधारे यांनी सांगितले. मी एक मध्यमवर्गीय असून, अब्रूशिवाय दुसरे काही जपायला आमच्याकडे नाही. तसेच अब्रूची किंमत कशातच करता येत नाही. ती लाखो कोटी रुपयांमध्येही होत नाही. त्यामुळे मला यामध्ये कोणत्याही आर्थिक लाभात किंवा स्टंटबाजीमध्ये पडायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Spread the love