एखाद्या वास्तविक घटनेवर आधारित चित्रपट तयार केला की, तो वादात अडकणं यात काही नवीन नाही. आत्तापर्यंत शेकडो चित्रपट काहीना काही कारणांमुळे वादग्रस्त ठरले आहेत.
सध्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 5 मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट वादात अडकला असून, रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसा हा वाद वाढत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाप्रमाणेच ‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाबाबतही अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
सहा दिवसांपूर्वी म्हणजेच 26 एप्रिल रोजी रिलीज झालेला ‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत 1.4 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका गटाच्या मते हा चित्रपट एक प्रोपोगंडा फिल्म आहे तर दुसऱ्या गटाच्या मते यातून केरळमधील वास्तव परिस्थिती दाखवण्यात आली आहे. ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरमध्ये ब्रेन वॉश, लव्ह जिहाद, हिजाब आणि आयएसआयएससारखे शब्द वापरण्यात आले आहेत. असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील 32 हजार बेपत्ता हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची ही कथा आहे.
ज्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं गेलं आणि नंतर त्यांना आयएसआयएसचं दहशतवादी बनवलं गेलं. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाच्या कथेबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत. केरळमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मुली व महिलांना खरोखर फूस लावण्यात आली आहे का? 32 हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना खरोखर आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत भरती करून घेतलं आहे का?
असे हे प्रश्न आहेत. ट्रेलरमध्ये काय दाखवण्यात आलं? ‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मल्याळम अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात अदानं शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या हिंदू कुटुंबातील मुलीची भूमिका साकारली आहे. काही लोक शालिनीचं धर्मांतर करतात आणि तिला फातिमा नावानं नवीन ओळख देतात, असं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
बुरखा घातलेली फातिमा आपली गोष्ट सांगताना दिसत आहे. ती म्हणते, “मी हिंदू होते. माझं नाव शालिनी उन्नीकृष्णन होतं. आता मला फातिमा या नावानं ओळखलं जातं.
मला नर्स व्हायचं होतं. पण आता मी अफगाणिस्तानात आयएसआयएसच्या एका दहशतवादी तुरुंगात आहे. माझ्यासारख्या 32 हजार मुली आहेत ज्यांचं धर्मांतरकरून सीरिया आणि येमेनमध्ये पाठवण्यात आलं आहे. सर्वसामान्य मुलींना दहशतवादी बनवण्याचा धोकादायक खेळ केरळमध्ये उघडपणे सुरू आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या रिपोर्टमधूनच मिळाली आकडेवारी ‘द केरळा स्टोरी’चे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांना चित्रपटात नमूद केलेल्या 32 हजार मुलींच्या धर्मांतराच्या आकडेवारीबाबत माहिती विचारण्यात आली असता ते म्हणाले की, 2010 मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी विधानसभेत एक अहवाल सादर केला होता.
ज्यात त्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या कार्यकाळात दरवर्षी सुमारे 2,800 ते 3,200 मुली इस्लाम धर्म स्वीकारत आहेत. म्हणजेच पाच वर्षांत 7800 हून अधिक मुलींची धर्मांतरं झाली. यावरून पुढील 10 वर्षांचा हिशेब केला असता ही संख्या 30 ते 32 हजार होते. फॅक्ट चेकर वेबसाइट ऑल्ट न्यूजशी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक, सुदीप्तो सेन यांनी या आकडेवारीबाबत असाच दावा केला आहे.
सेन म्हणाले की, ही आकडेवारी आम्ही तयार केली नसून, माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनीच जाहीर केलेली आहे. काय म्हणाले होते ओमान चंडी? विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर, केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी 2010 मध्ये नव्हे तर जून 2012 मध्ये कोर्टात या विषयाबाबत वक्तव्य केलं होतं. इंडिया टुडेनं दिलेल्या एका बातमीनुसार, ’25 जून 2012 रोजी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी विधानसभेत सांगितलं की, 2006 पासून राज्यातील 2,667 मुलींनी इस्लाम धर्म ‘स्वीकारला’ आहे.’ त्या निवेदनात दरवर्षी 2,667 मुलींचं ‘धर्मांतर’ होत असल्याचा उल्लेख नाही. ओमान यांनी विधानसभेत मांडलेली आकडेवारी सुमारे साडेसहा वर्षे जुनी होती.
म्हणजेच 2006 ते 2012 या साडेसहा वर्षांच्या कालावधीत केरळमध्ये 2,667 मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. या शिवाय, या महिला-मुलींच्या सीरियात जाण्याबद्दल किंवा आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याबाबत त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. म्हणजे चित्रपटात केलेल्या दाव्यानुसार, केरळमधील एकूण 32 हजार मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारला किंवा त्या आयएसआयएसमध्ये सामील झाल्याचा कोणताही पुरावा नाही. ‘द केरळ स्टोरी’चा अजेंडा काय आहे? विपुल शाह यांना चित्रपटाच्या अजेंड्याबाबत निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, ‘हा चित्रपट तीन मुलींच्या सत्यकथेवर आधारित आहे.
” हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत ‘द केरळ स्टोरी’मधील आकडे कितपत योग्य आहेत, याचा पुरावा तपासानंतरच समोर येईल. मात्र, सध्या तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा वातावरण निर्मिती केली आहे. हा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’प्रमाणे कमाई करेल की फ्लॉप होईल, हे पुढील काही दिवसांत समजेल.