मुंबई – राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजी अध्यक्षपदावरून निवृत्तीचा घोषणा केली. यानंतर देशभरात राष्ट्रवादी नेते-कार्यकर्त्यांसह संतापाची लाट उसळली आहे. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी देशभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. तर नेत्यांनी राजीनामा सत्र सुरु ठेवलं आहे. एवढच नाही तर ग्रामीण भागातील लोकांनी फोन करून, त्यांना प्रत्यक्ष भेटून विनवणी केली आहे. तर काहींनी रक्तांनं पत्र लिहून निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरलाय. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करताना शरद पवार यांनी त्यांच्या मनासारखा निर्णय घेतला जाईल यासाठी तीन दिवसांचा कालावधी मागितला.
दरम्यान, नविन अध्यक्ष निवडण्यासाठी त्यांनी एक समिती गठित केली. या समितीने आज एकमताने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीत पवारांनी विचार करण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना निर्णय बदलावा यासाठी आग्रह धरला आहे.आज कोअर कमिटीने त्यांचा राजीनामा नामंजूर केल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांनी निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी थोडा वेळ मागितल्याचे सांगितले.
शरद पवार 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. शरद पवार आज पुढची कोणती भूमिका जाहिर करणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलयं.