भुसावळ – येथील ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपला असल्याने येथील कारभार आता प्रशासक व ग्रामसेवक यांच्यावर सोपवण्यात आला असून गावातील अपुर्ण कामे पूर्ण केली जातील की तसेच राहतील अशी चर्चा सुरू आहे.
सुनसगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा पाच वर्षाचा कालावधी सरपंच व सदस्य यांच्यात झालेल्या चढाओढ तर कधी एकत्रीत तर कधी गोंधळ उडत कसा तरी पार पडला . वास्तविक पाहता सरपंच दिपक सावकारे हे लोकनियुक्त होते मात्र त्यांनी सदस्यांना सोबत घेऊन गावगाडा हाकण्याचा प्रयत्न केला.बऱ्याचदा समज गैरसमज यातून वाद निर्माण झाले आणि मिटत गेले.कार्यकाळ संपला तरी कोण सत्ताधारी आणि कोण विरोधक हे ग्रामस्थांना कळालेच नाही .
आज रोजी गावातील अनेक कामे अपुर्ण आहेत त्यात गावातील गटारी साफसफाई , ढापे दुरुस्ती , भोळे चौधरी गावदरवाजा , पुरुष मुतारी वर पाण्याची टाकी व नळ तसेच बेसीन , आर ओ पाणी शुद्धीकरण बंद आहे ते सुरु करणे , संत गाडगेबाबा चौक दुरुस्ती , बस स्थानकावर लावण्यात आलेले छोटे आर ओ मशीन सुरू करणे , स्मशानभूमीत लोखंडी जाळी लावणे , मंजूर घरकुलांचे काम करणे अशी अनेक कामे आहेत ही कामे प्रशासक व ग्रामसेवक यांनी हाती घेऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.