आज अमळनेरात कोळी लोकांचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह..प्रांत कार्यालयातच अंत्यसंस्कार करावेत – जगन्नाथ बाविस्कर.

0
20

चोपडा (प्रतिनिधी):- वर्षांनुवर्षांपासून कोळी लोकांना कागदाच्या एका तुकड्यासाठी (जातप्रमाणपत्रासाठी) शासन दरबारी भटकंती करावी लागत आहे. परंतु प्रशासन याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत आहे. म्हणुनच संबंधित विभाग खडबडून जागे झाला पाहिजे, यासाठी चोपडा तालुका महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी आपल्या शेकडों कोळीसमाज बांधवांसोबत आज दि. ८ मे पासून अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रहाचे हत्यार उपसले आहे. याठिकाणी तालुका जिल्हा व राज्यभरातून समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. निवेदनात नमूद केलेल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा सत्याग्रह सुरूच राहणार आहे. कोळी लोकांनी घरी न थांबता “अभी नही तो कभी नही” हे तत्व अंगीकारुन मोठ्या संख्येने अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोरील अन्नत्याग सत्याग्रहात सहभागी व्हावे, असे आवाहन जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर चोपडा म.वाल्मिकी नगर मित्र मंडळ, हिलाल सैंदाणे अमळनेर कोळी महासंघ व कोळी समाज पंच मंडळ यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

प्रांत कार्यालयातच अंत्यसंस्कार करावेत..

आम्हाला जोपर्यंत टोकरेकोळी (एसटी) चे सर्टिफिकेट मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहील. शासन प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा “जय वाल्मिकी समाजासाठी वाट्टेल ते करुं..जिंकु किंवा मरुं,” असा संकल्प करुन याठिकाणी मला जर मरण आले तर माझे अंत्यसंस्कार प्रांत कार्यालयातच करावेत.अशी माझी इच्छा आहे.

जगन्नाथ बाविस्कर, तालुका संपर्कप्रमुख महर्षी वाल्मिकी समाज मंडळ, ता.चोपडा.समन्वयक..कोळी समाज पंच मंडळ,अमळनेर.

Spread the love