अमळनेर प्रांतांसमोर अन्नत्याग केला.. इतर ठिकाणी आत्मदहन करावे लागेल का?

0
14

चोपडा –  चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळावेत यासाठी आम्ही आपल्या शेकडों समाजबांधवांसोबत नुकताच अमळनेर प्रांत कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह केला. त्यानुसार प्रभारी प्रांताधिकारी यांनी योग्य ती कागदपत्रे तपासून तसे दाखले देण्याचे सुरू केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतरही प्रांताधिकारी यांनी आदिवासी कोळी लोकांना तसे दाखले दिले पाहिजेत. तसेच जिल्हाभरातील कोळी लोकांनी आपापल्या प्रांत कार्यालयांकडे आनलाईन अर्ज सादर केले पाहिजेत. यासाठी जसा अमळनेर प्रांतांसमोर अन्नत्याग सत्याग्रह करावा लागला, तसा इतर प्रांताधिकारी कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन व आत्मदहन करावे लागेल का? (संबंधित विभागाने आम्हाला तशीही परवानगी द्यावी), असा संतप्त व उद्दिग्न सवाल चोपडा म. वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये उपस्थित केला आहे.

याबाबत जळगाव जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळी संघटना व सर्व प्रांताधिकारी यांची बैठक झाली होती. त्यात जिल्हाधिकारी यांनी कोळी लोकांना सुलभ पध्दतीने दाखले देण्याबाबतच्या सूचना केलेल्या आहेत. परंतु अजूनही इतर प्रांताधिकारी यांनी त्या आदेशाचे पालन केलेले नाही. संबंधित विभागाने तात्काळ तसे दाखले देण्याचे करावे, अन्यथा प्रत्येक प्रांत कार्यालयासमोर कोळी जमातीतर्फे शेकडोंच्या संख्येने तीव्र ठिय्या आंदोलन, उपोषण केले जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असाही कडक इशारा अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) यांनी यावेळी दिला आहे.

Spread the love