BCCI मध्ये निघाली नोकरी, पगार 1 कोटी, जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज?

0
14

बीसीसीआयने राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी औपचारिकपणे अर्ज मागवले आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला एक कोटी वेतन दिले जाणार आहे. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी बीसीसीआयने चेतन शर्मा यांना राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून असून निवड समितीचा नवीन सदस्य आयर्लंड मालिकेसाठी संघ निवडणाऱ्या पॅनेलचा भाग असेल अशी अपेक्षा आहे.

याआधी या सदस्याला देवधर करंडक आंतर-झोनल स्पर्धेत सहभाग घ्यावा लागणार आहे. या पदासाठी पात्रता निकष पूर्वीप्रमाणेच आहेत. अर्जदाराने सात कसोटी किंवा 10 एकदिवसीय सामने किंवा किमान 30 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असले पाहिजेत. तसेच त्याच्या सक्रिय क्रिकेटमधून निवृत्तीला किमान पाच वर्षे उलटून गेली असावी लागणार आहेत. T20 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर चेतन यांचा समावेश असलेल्या निवड समितीला बरखास्त करण्यात आले होते, परंतु गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेव्हा नवीन समिती स्थापन करण्यात आली तेव्हा त्यांनी पुन्हा अर्ज केला आणि त्यांची पुन्हा निवड झाली.

मात्र, स्टिंग ऑपरेशननंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक गौतम गंभीर (डिसेंबर 2018 मध्ये निवृत्त), युवराज सिंग (जुलै 2019 मध्ये निवृत्त) आणि क्रिकेटर-समालोचक हरभजन सिंग (2022 मध्ये निवृत्त) ही काही मोठी नावे या पदासाठी चर्चेत आहेत. परंतु ते तांत्रिकदृष्ट्या या पदासाठी पात्र होऊ शकत नाहीत. कारण त्यांच्या निवृत्तीला पाच वर्षे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आता वीरेंद्र सेहवाग हे एकमेव मोठे नाव या पदासाठी पात्र होऊ शकते.

Spread the love