सलग ३३ वर्ष पंढरीची पायीवारी करणारे साकळीचे विठ्ठलभक्त सुपडू तेली

0
12

साकळी ता.यावल -सलग ३३ वर्ष पंढरपुरची पायीवारी करणारे साकळीचे विठ्ठलभक्त सुपडू दामू तेली यंदाच्या ३४ व्या पायीवारीत सहभागी झालेले असून तब्बल महिनाभरानंतर आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाने यंदाच्या आपल्या पायीवारीची सांगता करणार आहे. सुपडू तेली यांच्या प्रमाणेच आणखी गावातील अनेक महिला-पुरुष वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी अनेक पायीवारी दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात.वयाच्या साठीपारही पायीवारी करत सुपडू तेली यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेले आहे.
सर्व तिर्थांचे माहेर असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यां प्रमाणे साकळी ता.यावल येथील भवानी पेठेतील रहिवाशी विठ्ठलभक्त सुपडू दामू तेली हे सलग ३३ वर्षांपासून पायीवारी करत आहे. जळगाव येथील ह.भ.प.मंगेश महाराज यांच्या वतीने आयोजित पायीदिडींत सुपडू तेली हे सन
१९८८ पासून सहभागी होत आहे.या दिडींत चोपदाराची महत्वाची जबाबदारी सांभाळत पायीवारीला जात असतात. कोरोना काळातील चुकलेली वारी वगळता सलग ३३ पायीवाऱ्या पूर्ण करून ३४ व्या वारीत पांडुरंगाच्या नामस्मरणाने ते मार्गक्रमण करीत आहे. सुपडू तेली यांच्या परिवारात पत्नी,दोन मुले,तीन मुली, सुना, जावाई,नातवंडे असा परिवार असून श्री तेली यांचे वय जवळपास ६५ पार केलेले आहे. तरी त्यांच्या विठ्ठल भक्तीत काहीही कमतरता नाही. तेली यांच्या मुखी सदासर्वदा ‘ हरी – हरी ‘ शब्द येत असल्याने त्यांना गावात सर्वत्र ‘हरी-हरी ‘ या नावानेच ओळखतात.हे विशेष आहे.गावातील अनेक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो.
पंढरपूरचे पांडुरंग माझे सर्वस्व आहे. देवाच्या दर्शनाने मला जिवनाचा परमानंद मिळत असतो.दर वर्षाच्या पायीवारीने मला एक वेगळा आनंद व ऊर्जा मिळत असते.एकूणच माझे जीवन पांडुरंगाच्या चरणी समर्पित आहे.पायीवारीत सहभागी होण्यासाठी पांडुरंगच मला शक्ती देत असतो. असे सुपडू तेली यांनी जळगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या पायीवारीतूनच सांगितले आहे.

Spread the love