राज्याच्या राजकारणात रविवारी पुन्हा एकदा भूकंप झाला. ईडी-सीबीआयच्या जोरावर आधी शिवसेना फोडणाऱ्या भाजपनं आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पळवापळवी केली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलेलं असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यासोबत बोलणं झाल्याची माहिती दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, ‘मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू’.