अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 मोहिमेचे शुक्रवारी दुपारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान 3 अवकाशात झेपावल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी जल्लोष साजरा केला. आता फक्त उत्सुकता लागली आहे ती चांद्रयानाच्या चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंगची. हे चांद्रयान 24 ऑगस्टपर्यंत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने ही महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. 615 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे. अवकाशात झेपावल्यानंतर हे यान सुरूवातीला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरूवात करेल. काही काळानंतर पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि चंद्राच्या कक्षेत पोहचेल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्या जातील. 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान चंद्रावर अलगद उतरेल. त्यानंतर लँडरमधून रोव्हर चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. हा रोव्हरमार्फत चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाईल.
…तर हिंदुस्थान चौथा देश ठरेल
इस्त्रोची चंद्रावर स्वारी ही महत्वकांक्षी मोहीम आहे. हिंदुस्थानबरोबर जगाचे लक्ष चांद्रयान-3 कडे असणार आहे. कारण 2019 मध्ये चांद्रयान-2 ही मोहीम अयशस्वी झाली होती. त्यावेळी चंद्रावर उतरताना लँडर चंद्राच्या जमिनीवर आदळून तुकडे झाले होते.
श्री बालाजी चरणी प्रतिकृती अर्पण
ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या टीमने आज तिरूपती येथे जाऊन श्री बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी चांद्रयान-3 ची प्रतिकृती श्री बालाजी चरणी अर्पण करण्यात आली.