जळगावातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा

0
37

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाच्या जळगावातील जिल्हा कार्यालयावर अजित पवार गटाने आपला हक्क सांगितला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे हे कार्यालय पक्षाचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीचे असून, ते सध्या शरद पवार यांचे सोबत आहेत. तर त्यांचे चिरंजीव मनीष जैन हे अजितदादांसोबत आहेत.

अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात समर्थकांच्या बैठकीत बोलताना पक्ष कार्यालयावर दावा करणार असल्याचे जाहीर करत खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे या बैठकीस मनीष जैन हे उपस्थित होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आकाशवाणी चौकातील कार्यालय हे पक्षाचे माजी खासदार शरद पवार यांचे कटटर समर्थक ईश्वरलाल जैन यांच्या खासगी मालकीचे असून ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीही अट न ठेवता वापरण्यासाठी दिले आहे. 15 वर्षापूर्वी या कार्यालयाच्या जागेसह बांधकामासाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च आला होता. त्यापैकी निम्मा खर्च जैन यांचा होता. तर सव्वा कोटी रुपये पक्षाने द्यावे अशी मागणी होती. हा प्रस्ताव पक्षालाही मान्य होता. या निर्णयावर सर्वांनी विशेषतः शरद पवार आणि अजितदादा यांनी सहमती दर्शवली होती. मात्र, अंमलबजावणी न झाल्याने जैन यांनी सर्व खर्च केला. आजपर्यंत त्यांना पक्षाकडून याबाबत काहीही रक्कम मिळाली नाही. आता या जागेवर बँकेचे कर्ज आहे. राष्ट्रवादीचा जो गट ही रक्कम जमा करून कर्ज मुक्त करेल त्या गटाला ह्या कार्यालयाचा ताबा मिळू शकेल. सध्या या कार्यालयावर अकरा कोटी रुपये कर्जाचा बोजा आहे. ज्या गटाकडून हे अकरा कोटी रुपये भरले जातील त्यांना त्या कार्यालयाचा ताबा देण्यास तयार असल्याची भूमिका ईश्वरलाल जैन यांनी घेतली आहे. सध्या जिल्हयातील पक्षाचे पदाधिकारी नेते यांनी शरद पवार यांचे सोबत राहण्याचा सावध पवित्रा घेतला आहे. जैन पिता पुत्र हे दोन वेगवेगळया गटात गेल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत असले तरी मनीष जैन यांचा तो स्वतंत्र निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे.

Spread the love