हिंदू धर्म इस्लामपेक्षाही जुना, सध्याचे मुसलमान आधी हिंदूच होते! – गुलाम नबी आझाद

0
13

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसपासून वेगळी चूल मांडत डेमोक्रेटीव्ह प्रोग्रेसीव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) बनवणारे गुलाम नबी आझाद यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हिंदू धर्म इस्लामपेक्षाही जुना असून सध्याचे सर्व मुसलमान आधी हिंदूच होते असे म्हणताना दिसत आहेत. गुलाम नबी आझाद यांचा हा व्हिडीओ जम्मू-कश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळतेय.

डोडा जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात गुलाम नबी आझाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना आझाद म्हणतात की, इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वी झाला. हिंदुस्थानात कोणीही बाहेरचा नाही. आपण सर्व या देशातीलच आहोत. हिंदुस्थानातील मुसलमान मूळचे हिंदूच असून नंतर त्यांचे धर्मांतर करण्यात आले.

ते पुढे म्हणाले की, 600 वर्षांपूर्वी कश्मीरमध्ये फक्त कश्मीरी पंडित होते. मात्र त्यानंतर अनेक लोकं धर्मांतर करून मुसलमान झाले. यावेळी आझाद यांनी उपस्थितांना बंधुभाव, शांतता आणि एकता राखण्याचेही आवाहन केले.

राजकारणामध्ये धर्म आणणाऱ्यांचीही त्यांनी कानउघाडणी केली. राजकारणामध्ये धर्म आणू नका. लोकांनी धर्माच्या आधारावर मतदान करणे बंद करावे. राजकारणामध्ये जो धर्माचा आधार घेतो तो कमकुवत असतो. ज्याचा स्वत:वर विश्वास असेल तो धर्माचा आधार घेणार नाही. मी पुढे काय करणार, विकास कसा करणार हे तो व्यक्ती सांगेल. पण जो दुर्बल आहे तो मी हिंदू आहे किंवा मी मुसलमान आहे म्हणून मला मतं द्या असे बोलेल, असेही आझाद यावेळी म्हणाले.

आपण बाहेरून आलेलो नाही. आपला जन्म याच मातीत झाला आहे. यात मातीत आपण दफन होणार आहोत. भाजपच्या एका नेत्यांने म्हटले की काही लोक बाहेरून आले आहेत. माझे म्हणणे आहे की बाहेरून कोणी आले नाही. हिंदूंमध्ये जाळले जाते आणि अस्थी नदीत सोडल्या जातात. ते पाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाते. शेतातील पिकांनाही तेच पाणी जाते, याचाच अर्थ ते आपल्या पोटातही जाते. त्याचप्रमाणे मुसलमानांनाही याच जमिनीत दफन केले जाते. त्याचे शरीर याच मातीचा भाग बनते. मग तुम्ही हिंदू, मुसलमान असा भेदभाव का करता? दोघेही याच मातीत मिसळून जातात. हे सगळे राजकीय द्वंद्व असल्याचे आझाद म्हणाले.

Spread the love