जळगाव – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी (ता. १०) जळगावचा दौरा निश्चीत झाला आहे. जळगाव येथे पिंप्राळा भागात होत असलेल्या त्यांच्या सभेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.
श्री. ठाकरे यांच्या हस्ते पिंप्राळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे, तसेच महापालिकेत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंप्राळा येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
जळगावात त्यांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. तर, पिंप्राळा येथील मानराज पार्कजवळील मोकळ्या जागेत सभेची तयारी अंतीम टप्प्यात आहे.
या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी भव्य वॉटरप्रुफ तंबू उभारण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांचा जळगाव येथील दौरा कार्यक्रमही प्राप्त झाला आहे. त्यानुसार श्री. ठाकरे मुंबई येथून सकाळी साडेदहाला विमानाने जळगाव विमानतळावर पोचतील.
सकाळी अकराला त्यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे व त्यानंतर दुपारी बारा वाजून पंधरा मिनीटांनी पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.
दुपारी एकला मानराज पार्कजवळील मैदानात जाहीर सभा व तेथून दुपारी अडीचला ते जळगाव विमानतळाकडे रवाना होतील. तेथून ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील. त्यांच्यासमवेत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा प्रमुख संजय सावंत उपस्थित असतील.
महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सभेची तयारी करण्यात येत आहे.