44 पायऱ्या उतरून न्यायालय आले पीडितांकडे; पाय गमावलेल्यास 15 लाख, जायबंदीस 3 लाखांची भरपाई

0
29

जळगाव – अपघात घडल्यापासून जो याचक म्हणून आर्जव करतोय आणि सर्वच ठिकाणी निराशा पदरी पडतेय, अशा दुःखितांसाठी चक्क न्यायालयच ४४ पायऱ्या उतरत भरपाई देण्यास आले. पीडितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली अन्‌ धनादेश देऊन सांत्वनही केले.

पूज्य साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म…’ या काव्यपंक्तींचा प्रत्ययच शनिवारी (ता. ९) जिल्‍हा न्यायालयात दोन वेगवेगळ्या घटनांतून आला.

अपघातात पाय गमावलेल्या कैलास इंगळे यांच्याशी चर्चा करताना न्या. एस. पी. पवार व मान्यवर.

अपघातामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या जखमीला घेऊन त्याचे कुटुंबीय लोकअदालतीत आले होते. तर, दुसऱ्या खटल्यात अपघातात पाय गमावलेल्या एका गृहस्थास व्हिलचेअरवर न्यायालयात आणण्यात आले.

पहिल्या घटनेत सोपान भादू रोटे (वय ६५, रा. नशिराबाद) यांचा बोलेरो कारचालकाने निष्काळजीपणे भर रस्त्यात कारचा दरवाजा उघडल्याने झालेल्या अपघाताच्या खटल्यात न्या. जयदीप मोहिते यांच्या पॅनलचे न्यायालय जखमीपर्यंत आले. चौकशीनंतर विमा कंपनीस सूचना देत, तत्काळ तीन लाख १५ हजारांचा धनादेश रोटे कुटुंबीयांना सोपविला.

विधी सेवा प्राधिकरणचे न्या. एस. पी. सय्यद, विमा कंपनीचे अॅड. प्रसाद गोडबोले, सरकारी वकील अब्दुल कादीर, ॲड. सुनील पाटील यांच्यासह कर्मचारी या वेळी उपस्थित होते. तर, दुसऱ्या घटनेत पिंपळगाव खुर्द (ता. वरणगाव) येथील कैलास रामदास इंगळे (४५) व त्यांचा मुलगा गौरव (१९) हे पिता-पुत्र अपघातात जखमी झाले होते.

श्री. इंगळे यांना मल्टिपल फ्रॅक्चर्समुळे त्यांचा पाय कापावा लागला. न्या. एस. पी. पवार यांना त्यांची अवस्था कळताच त्यांनीही थेट तळमजल्यावर पोहोचत आस्थेवाईकपणे चौकशी करून व सविस्तर माहिती जाणून घेत विमा कंपनीला जखमी मुलासाठी एक लाख, तर इंगळे यांना १२ लाख अशी एकूण १३ लाखांची नुकसान भरपाई जागेवरच देण्यास भाग पाडले. या वेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. सय्यद, ॲड. चौगुले, ॲड. प्रसाद गोडबोले आणि ॲड. एम. एस. चौधरी आदी उपस्थित होते.

Spread the love