सुनसगावात घाणीचे साम्राज्य, साथीचे आजार पसरण्याची शक्यता?

0
37

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाही तसेच सध्या प्रशासक राज आहे तसेच ग्रामसेविका यांच्या कडे तीन गावांचा कार्यभार आहे त्यामुळे गावाकडे पाहिजे तसे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या बाबत माहिती अशी की, येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपला असल्याने येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक राज आहे. गावाला सफाई कर्मचारी नाही त्यामुळे गावात गटारी तुंबल्याने गटारीचे सांडपाणी रस्त्यावर येत आह. गल्लोगल्ली गटारीत डासांची उत्पत्ती वाढली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

गावाच्या आजूबाजूला महिलांसाठी शौचालय बांधण्यात आले आहेत परंतु शौचालयाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत व वेली तसेच काटेरी झुडपे वाढलेली आहेत त्यामुळे महिलांना शौचालयात सुध्दा जाता येत नसल्याने महिलांना नाईलाजास्तव रस्त्यावर बसावे लागत आहे तसेच पुरुषांच्या शौचालयात सुध्दा लाईट बंद पडले आहेत.

स्मशानभूमी रस्त्यावर लाईट गेलेले असल्याने अंधार आहे त्यामुळे गावात रात्रीच्या वेळी कोणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जायचे असेल तर अंधारात जावे लागत आहे . गावात लाखो रुपये खर्च करून आर ओ मशीन बसविण्यात आले असले तरी मशिन बंद असून मशिन जवळ मोठ्या प्रमाणात घाण साचली यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येथील ग्रामसेविका यांच्या कडे जोगलखेडा, भानखेडा, गोंभी, सुनसगाव अशा चार गावांचा कार्यभार आहे त्यात ग्रामस्थ घरपट्टी , पाणीपट्टी भरत नसल्याने वसूल होत नाही. त्यामुळे गावविकासाला खिळ बसल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. विज वितरण कंपनीचे विज बिल थकबाकी झाल्याने ग्रामपंचायत पाणीपुरवठा केव्हाही बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढा सारा प्रकार असताना जेसीबी मशीन ने स्मशानभुमी रस्त्याची साफसफाई करावी आणि महिला शौचालय मोकळे करावे तसेच गावात तणनाशक फवारणी करावी आणि गावातील लाईट लावण्यात यावे तसेच गटारी साफसफाई करण्यासाठी सफाई कर्मचारी मिळत नसेल तर स्थानिक मजूरांकडून काम करुन घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Spread the love