जळगाव – गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करताना तलाठी पथकाने कारवाई केली. ट्रॅक्टर चालकाची विचारपूस करत असताना चालक वाहन सोडून फरारी झाला. याप्रकरणी तलाठ्याने दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शहरातील श्रीधरनगर येथे राहणारे तलाठी राजू कडू बहारे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास रामानंदनगर येथून मेहरूणला ड्यूटीवर जात होते. गिरणा टाकी परिसरात (एमएच १८ झेड ७९३२) ट्रॅक्टर व (एमएच १९ एएन ८६५१) क्रमांकाच्या ट्रॉलीतून वाळू खाली करताना दिसले.
तलाठींनी ट्रॅक्टरचालकाला ट्रॅक्टर खाली न करण्यास सांगत त्याची विचारपूस केली. चालकाने त्याचे नाव गणेश अशोक कुंभार (रा. पाळधी) तर ट्रॅक्टर मालक (प्रवीण हिरामण बाविस्कर, रा. निमखेडी) असे सांगत त्यांच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर चालवत असल्याचे सांगितले.
वाळू कोठून आणली, असे विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. चालकाची विचारपूस करीत असताना चालकाने ट्रॅक्टर सोडून तेथून पळ काढला. तलाठींनी ट्रॅक्टर रामानंदनगर पोलिस ठाण्यात जमा केला असून, ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.









