जळगावमध्ये बसवर दगडफेक; चिमुकली जखमी, वाहकालाही केली मारहाण

0
37

जळगाव – जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. मेहकरहुन भुसावळकडे जाणाऱ्या बसवर एकानं वरणगाव नजिकच्या सातमोरी पुलाजवळ दगडफेक केली आहे. या घटनेत बसच्या काचा फुटल्या असून, एक पाच वर्षांची चिमुकली जखमी झाली आहे.

तसेच आरोपीने वाहकाला देखील मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, संशयित आरोपीला अटक करण्यात आलं आहे. मात्र या दगडफेकीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बस क्रमांक एम. एच 40 एन 9941 ही बस मेहकरवरून भुसावळला जात असताना आरोपी विशाल बोंडे हा महामार्ग क्रमांक सहावर आपल्या दुचाकीवर बसच्या पुढे आला, त्याने दुचाकी आडवी लावून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी चालक, वाहक त्याला समजावण्यासाठी गेले असताना त्याने बसवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीमध्ये बसच्या काचा फुटल्या आहेत. तसेच बसमधून प्रवास करणाऱ्या एका चिमुकलीला दुखापत झाली आहे. देवांशी स्वप्नील सुलताने वय – वर्ष -५ राहणार गुंजखेडा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा असं अपघातामध्ये जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे.

विशाल बोंडे याने वाहक पिंगळे यांना देखील मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी बसचे चालक योगेश सांवळे यांच्या तक्रारीवरून बोंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Spread the love