जळगाव – नातेवाईकांकडे असलेल्या लग्नाच्या बस्त्यासाठी शहरातील टॉवर चौकातील एका कापड दुकानावर आलेल्या पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद उद्भवला आणि पतीने पत्नीला तू घरी ये, तुला पाहतोच असे म्हणत रस्त्यावरच मारहाण केली.
ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील पती-पत्नी हे नातेवाईकांकडे असलेल्या लग्नाच्या बस्त्यासाठी जळगाव शहरातील टॉवर चौकात आले होते. शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्यासोबतच पत्नीचे भाऊ, भावजयी यांच्यासह इतर नातेवाईकही होते. पतीदेव थेट मद्यपान करून आल्याने पती-पत्नीत वाद सुरू झाला. त्यानंतर पतीने शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच तू घरी ये तुला पाहतोच, असे म्हणत चांगलाच संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमध्ये बराच वेळ वादविवाद सुरूच राहिला. अखेर हा वाद शहर पोलिस ठाण्यात पोहचला. तेथे पत्नीने थेट पतीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या वेळी पतीनेही पत्नीसह नातेवाईकांनीदेखील मारहाण केल्याचा आरोप केला. बस्ता ज्या दुकानात घ्यायला गेले तेथे न घेता दुसऱ्या दुकानातून घेऊ, असे मी सांगत होतो, त्यावरून मला मारहाण केल्याचे पतीचे म्हणणे होते.