बुलढाणा – जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक या दोघांना १२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई आज (दि.१३) सकाळी ११ च्या सुमारास केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे देयक अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित कंत्राटदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली होती. लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे या संबंधीची तक्रार कंत्राटदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज सापळा रचून जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे (वय ३२) आणी विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके (वय 30) या दोघांना तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना नगरपरिषद कार्यालयात रंगेहात पकडले.
मुख्याधिकारी आकाश डोईफोडे अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके मोताळा तालुक्यातील उबाळखेडचा मूळ रहिवासी आहे. एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे व पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, महेश भोसले, शाम भांगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईनंतर नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली.