जळगाव – शहरातील मोहाडी गावात अक्षय तृतीयानिमित्त पत्ता खेळण्याचा डाव सुरू असताना झालेल्या वादातून मोहाडी रोडवरील जगवानी पेट्रोल पंपाजवळ दोन गटात तुफान दगडफेक होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना शुक्रवारी १० मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
या दगडफेकमुळे एका वाहनाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दगडफेकीवर नियंत्रण मिळवले असून रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी गावात अक्षयतृतीयेच्या निमित्ताने शुक्रवारी १० मे रोजी पत्ते खेळण्याचा डाव सुरू होता. यामध्ये पत्ते खेळत असताना एकासोबत वाद झाल्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो व्यक्ती एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता, परंतु त्यांनी तक्रार दिली नाही. तो परत मोहाडी गावात येण्यासाठी निघाला होता. दरम्यान सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मोहाडीरोड वरील इम्पेरियल अपार्टमेंट जवळील जगवानी आणि पेट्रोल पंपासमोर दुपारच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले. दोन गटातील हा वाद जास्त वाढल्याने काही तरुणांनी दगडफेक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीमध्ये रस्त्यावर उभी असलेली एक चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्या घरावर देखील दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या घराच्या गॅलरीत आणि खिडकीचे काच फोडले गेल्या. त्यामुळे त्यांच्या घरातील लहान मुलं व महिला यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. नाना तायडे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.