पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पुण्याची संस्कृती लयाला गेल्याचे चित्र दिसून येते. पुण्यात सतत होणारे अपघात, हत्या, कोयता गँग अशा गुन्हेगारीच्या घटनांनी पुण्यात धुमाकूळ घातला आहे. अशातच पुणे शहराला हादरवून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका १३ वर्षीय मुलीवर तिचे वडील, काका आणि चुलत भावाने बलात्कार केला आहे. पीडित मुलगी तिच्या आई, वडील, काका व चुलत भाऊ यांसह एकत्र कुटुंबात हडपसर येथील मांजरी भागात राहत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पीडित मुलीवर सतत अत्याचार केले असल्याची माहिती मिळत आहे. पीडित मुलीने यासंदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते जून २०२४ या कालावधी दरम्यान घडला आहे.
नेमके प्रकरण काय?
पीडित मुलीवर जुलै २०२२ मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरात तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर भावाने हे प्रकरण कोणाला सांगितल्यास तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. तर, २०२४ मध्ये पीडित मुलीच्या काकाने रात्रीच्या वेळी फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेली असता घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चक्क तिच्या वडिलांनीही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण देखील केली. मात्र या सर्व त्रासाला कंटाळून मुलीने याबाबत आईकडे तक्रार केली व घडलेला सर्व प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे. मात्र पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.