एरंडोल तालुक्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली! ट्रॅक्टर ट्रॉली उलटविल्याने तलाठी जखमी; उत्राण येथील घटना

0
13

एरंडोल – तालुक्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली आहे. वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक महसूल पथकाने पकडली. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाने वाळूने भरलेली ट्रॉली उलटविल्याने ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी यांना डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले.

ही घटना आज सोमवारी (ता.२४) सायंकाळी घडली.

दरम्यान, या घटनेनंतर महसूल विभागात व तालुक्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील तालुक्यातील उत्राण येथे वाळूमाफियांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता.

येथील महसूल सहायक स्वप्निल पोळ, राजेंद्र याज्ञिक व तलाठी सागर कोळी हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उत्राण रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना उत्राण रस्त्यावरील स्टोनक्रशरजवळ क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाळू भरलेली आढळून आली.

महसूल पथकाने ट्रॅक्टरचालकाकडे वाळूबाबत माहिती विचारली. मात्र, तो उडवाउडवीचे उत्तर देवू लागल्याने महसूल पथकातील सदस्यांनी ट्रॅक्टर तहसीलदार कार्यालयात नेण्याचे चालकास सांगितले. त्याचवेळी त्याठिकाणी ट्रॅक्टरमालक व त्यांचे सहकारी आले व त्यांनी पथकातील सदस्यांशी वाद घातला.

महसूल पथकातील सदस्यांनी ट्रॅक्टरबाबतची माहिती तहसीलदार सुचिता यांना कळविल्यानंतर नायब तहसीलदार दिलीप पाटील, सदानंद मुंडे, सुरेश कट्यारे, सुधीर मोरे हे शासकीय वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. वाळूचे ट्रॅक्टरवर तलाठी सागर कोळी हे बसले. ट्रॅक्टर तहसीलदार कार्यालयात आणताना चालकाने अंजनी नदीवरील लहान पुलाजवळ

असलेल्या मारीमाता मंदिराजवळील आठवडे बाजाराच्या भिंतीवर ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने तलाठी सागर कोळी हे खाली पडले. तलाठी सागर कोळी यांच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाले. ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्यानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

तहसीलदारांनी घेतली जखमी तलाठीची भेट

जखमी तलाठी कोळी यांना खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पारोळा येथे रवाना करण्यात आले. दवाखान्यात तहसीलदार सुचिता चव्हाण, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी जखमी तलाठी सागर कोळी यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली.

याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, वाळूमाफियांचे ट्रॅक्टर ट्रॉलीवर कारवाई केल्यानंतर वाळूची वाहतूक करणारे पन्नास ते साठ वाळूमाफिया जमा झाले होते. यापूर्वीदेखील वाळूमाफियांनी प्रांताधिकाऱ्यांसह महसूल कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

Spread the love