आता दररोज राहुल गांधींना राम राम करुनच मोदींना सदनात बसावं लागेल, संजय राऊत यांचा टोला

0
15
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत अध्यक्षपदाची निवडणूक, राम मंदिराला लागलेली गळती या विषयांवरून केंद्रातील एनडीए सरकारला फटकारले आहे. यावेळी त्यांनी आता नरेंद्र मोदींना दररोज राहुल गांधींना राम राम करूनच सदनात बसावं लागेल असा टोला देखील मोदींना लगावला आहे.

”लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये ही देशाची परंपरा आहे. मात्र भाजपने ही पंरपरा मोडली. अध्यक्षपद हे कोणत्याही पक्षाचं नसतं. मात्र गेल्या दहा वर्षापासून भाजपचा हुकुम माणणारे लोक तिथे बसत आहेत. एकाच वेळी 80 खासदारांना निलंबीत करून लोकशाहीचा गळा घोटणारे ओम बिर्ला आहेत. त्यांना जाणीवपूर्वक पदावर आणण्याचा प्रयत्न झाला. मोदीजींनी काल आम्हाला आणिबाणीची आठवण करून दिली. पण तुमच्या आदेशाने ज्या ओम बिर्लां यांनी दोन्ही सदनातले 140 खासदार निलंबीत केले. त्या ओम बिर्लांनाच तुम्ही परत आणताय. हे काय आहे? विरोधी पक्ष तुम्हाला लोकशाहीचा मान राखायला सांगत होता. के सुरेश हे सदनातले सगळ्यात सिनियर सदस्य आहेत. तरिही त्यांना डावलून त्यांच्या तुलनेत कनिष्ठ खासदाराला प्रोटेम स्पिकरची शपथ दिली. यांचा सुंभ जळलाय पण पिळ कायम आहे. तो पिळ पण जळेल लवकरच, असे संजय राऊत म्हणाले.

”विरोधी पक्षाला उपाध्यक्ष पद देण्याची परंपरा आहे. तिच इंडिया आघाडीची भूमिका होती. तसा शब्द विरोधी पक्षाने मागितलेला मात्र भाजपने तसा कोणताही शब्द दिलेला नाही. ते आरोप करतात की आम्ही अटी शऱ्ती घातल्या. पण मोदी शहांच्य़ा इस्ट इंडिया कंपनीला कोण अटी शर्ती घालणार? गेल्या दहा वर्षात त्यांच्याच अटीशर्तींवर लोकसभा चालली. आता त्यांना ते शक्य नाही. आता एवढा मोठा विरोधी पक्ष समोर बसलाय. राहुल गांधी आता विरोधी पक्ष नेते म्हणून बसणार आहेत. त्यामुळे शिष्टाचाराप्रमाणे राहुल गांधी यांना राम राम करूनच मोदींना बसावं लागेल. आता अधिवेशन सुरू असताना मोदींना पळ काढता येणार नाही. राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेते पद स्वीकारलं हे लोकशाहीच्या दृष्टीने हे शुभसंकेत आहेत. त्यासाठी त्यांचे आभार मानतो”, असे संजय राऊत म्हणाले

”अरविंद केजरीवाल यांना पीएमएलए कोर्टाने जामीन दिलेला असताना सरकारने दबावतंत्राचा वापर करून हायकोर्टातून जामीन रद्द करून घेतला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळू शकतो हे त्यांना माहित असल्याने आधीच त्यांनी सीबीआयकडून केजरीवालांची अटक घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच पॅलेस्टाईनचा नारा देऊन जर ओवैसींकडून चूक झाली असेल असं सरकारला वाटत असेल सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असेही संजय राऊत म्हणाले.

राम मंदिराच्या गळतीवरूनही संजय राऊत यांनी मोदींना फटकारले आहे. ”राम मंदिराला गळती लागली आहे. हा प्रभू श्रीरामांनी त्यांना दिलेला श्राप आहे. गाजावाजा करत ज्या प्रकारे श्री रामाचा राजकीय वापर केला. प्राणप्रतिष्ठेची नौंटकी केली गेली. घाई घाईत राम मंदिरांची प्राण प्रतिष्ठा केली. लोकांना मूर्ख बनवण्याचं काम केलं. रामाच्या गर्भगृहात पाणी गळतंय हे दुर्दैव, असे संजय राऊत म्हणाले.

Spread the love