जळगाव – दिवसेंदिवस महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. चिमुकल्या मुलींसह अबाल वृद्धा देखील असुरक्षित आहेत. त्यातच जळगावमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पैशांवरील व्याज न दिल्याने सिंधी कॉलनी परिसरातील शाळेत १५ वर्षीय मुलीस बळजबरी नेत विनयभंग करून धमकावण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन महिलासंह त्यांच्या पतींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडितेला धमकावणारा शिक्षक असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काजूच्या व्यवसायासाठी पीडितेच्या आईवडिलांनी सुवर्णा रामकृष्ण पाटील (रा. संत मीराबाईनगर) व वंदना अजय पाटील (रा. खोटेनगर) यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. त्यापोटी चार कोरे चेक दोघांना दिले होते. पीडितेच्या आईने घेतलेल्या दोन लाखांऐवजी तब्बल सहा लाख रुपये व्याज म्हणून दोघी महिलांना परत केले आहे. तरीही १ लाख ४० हजारांची बाकी असल्याने संबंधितांकडून पैशांचा तगादा सुरू होता.
संशयितांनी मुलीला १२ जूनला बळजबरी दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या आईने फोनवरून विनवण्या केल्यावर दोघी बहिणींना सोडून देण्यात आले. पीडिता शिक्षण घेत असलेल्या शाळेत संशयित सुवर्णा पाटील यांचे मेहुणे अजय शांताराम पाटील शिक्षक आहेत. १८ जूनला या शिक्षकाने पीडितेला पैशांसाठी धमकावले व विनयभंग केला. घडला प्रकार कुणाला सांगितला, तर दोघी बहिणींना मारून टाकू, असे धमकावल्याचे पीडितने तक्रारीत नमूद केले आहे.
मदतीनंतर तक्रार
दरम्यान पीडित कुटुंबाने भितीमुळे कुठेच तक्रार न केल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. अखेर मेहरुण परिसरातील काही सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन अव्हाड यांना घडलेला प्रकार सांगितला.
अखेर गुन्हा दाखल
या प्रकरणी सुवर्णा पाटील, रामकृष्ण देवराम पाटील (रा. संत मीराबाईनगर) शिक्षक अजय पाटील, वंदना शांताराम पाटील (श्रद्धा कॉलनी, दत्तमंदिराजवळ) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले तपास करीत आहेत.