13 वर्षीय मुलाचं अपहरण! 5 कोटींची मागणी अन् फडणवीसांनी घेतली दखल, अखेर काय घडलं?

0
13

जालना – जालना येथून अपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात कृष्णा मूजमुले पाटील यांचा 13 वर्षीय मुलगा श्रीहरी कृष्णा मूजमुले याचं अपहरण झालं. शाळेत जाताना सकाळी 8 च्या सुमारास रस्त्यातून त्याचं अपहरण करण्यात आलं.

अपहरण केल्यानंतर तब्बल 2 तासांनी मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांचा फोन आला. मुलाच्या सुटकेच्या बदल्यात त्यांनी 5 कोटीची खंडणी मागितली.

कोणतीही वेळ न गमावता मुलाच्या वडिलांनी सदर हकीकत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांना फोनवर कळवली. ओमप्रकाश शेटे यांनी सदर बाब राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यासंदर्भात ऍक्शन घेत जालन्याचे SP यांना यासंदर्भात सूचना दिल्या आणि अपडेट्स देण्याच्या सूचना केल्या. स्वतः गृहमंत्री लक्ष घातल्याने पोलीसदेखील ऍक्शन मोडवर आले. जालना SP यांनी Add. SP यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांची पथकं तयार करण्यात आली. घटनेला 2 तास झाल्याने अपहरणकर्ते जास्त लांब गेले नसतील, या दिशेने तपास सुरू झाला. रस्त्यातील CCTV फुटेज खंगाळत पोलिसांना अपहरणकर्त्याचे आयडेंटीफिकेशन करण्यास यश मिळाले. अपहरण झाल्यानंतर 5 तासात पोलिसांनी आरोपी आयडेंटीफाय केले. इकडे अपहरणकर्ते मुलाच्या वडिलांना फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागू लागले. 5 कोटी नाही दिले तर मुलाला एड्सचा स्टेरॉइड देऊन जीवे मारू, अशी धमकी अपहरणकर्ते देऊ लागले.

 

छोटा आयुर्वेदीक मेडिकलचा व्यवसाय करणाऱ्या मुलाच्या वडीलांने अपहरणकर्ते यांना विनवणी करू लागले. माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत 5 लाख रुपये पर्यंत देतो, असं त्यांनी सांगितलं. पण शेवटी 10 लाख रुपये देण्याचं ठरलं. पोलिसांनी सगळी सूत्रे हातात घेतल्याने आरोपींचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात झाली. पण, मुलगा सुखरूप राहिला पाहिजे या दिशेने पोलीस काम करत होते.

10 लाख रुपये देण्याचं ठरलं असल्याने पैशांची व्यवस्था करून मुलाच्या वडीलांना रात्री साडेआठ वाजता मंठा रोड डी- मार्ट जालना या ठिकाणी येण्यास सांगितलं. पोलिसांनी रचलेल्या सापळ्याप्रमाणे मुलाचे वडील 10 लाख रूपये घेऊन निघाले. त्या ठिकाणी गेल्यावर अपहरणकर्त्यांना 10 लाख रुपये देऊन मुलाला ताब्यात घेतलं. पैसे घेऊन तिथून पळ काढण्याआधीच पोलिसांनी झडप घातली. अरबाज शेख, राहुल गेरूवाल आणि वर्मा नावाच्या तीन अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि मुलाची सुटका केली.

Spread the love