जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने गैरकृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी व्हॅन चालकाच्या विरोधात पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षीय मुलीला स्कूल व्हॅन चालकाने शाळेच्या बाहेर स्कूल व्हॅनमध्ये बसवले. त्यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य केले. चिमुकली घरी आल्यानंतर पालकांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर तिच्या पालकांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयित स्कूल व्हॅनचालक प्रसाद हिरामण चौधरी याला अटक करून त्याच्या विरुद्ध पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.