बांगलादेशमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा!

0
28

लष्कराच्या विमानातून त्या भारताच्या दिशेने येत असल्याची माहिती

ढाका : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रचंड हिंसाचार सुरु आहे. अनेक जणांनी यात आपला जीव गमावला आहे. त्यातच आता बांगलादेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना  यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्या व त्यांची बहीण देश सोडून सुरक्षित पण अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून शेख हसीना ढाक्यामधून भारताकडे रवाना झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मोठ्या संख्येनं आंदोलक पंतप्रधान शेख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

बांगलादेशात सध्या अस्थिर वातावरण आहे. यामुळेच त्या राजीनामा देऊन बांगलादेश सोडून सुरक्षित स्थळी गेल्याची माहिती मिळत आहे. शेख हसीना यांच्या मुलाने सुरक्षा दलांना आवाहन केलं होतं की, राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर सैन्याने अलर्ट राहावं. त्या पार्श्वभूमीवर ढाक्यासह देशभरात सैन्य तैनात करण्यात आलं होतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बांगलादेशमध्ये का उफाळला हिंसाचार?

बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणावरुन वादंग सुरु आहे. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे.

बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये ३० टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना ५ टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.

Spread the love