सध्या जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमधील अहमदाबाद शहरात आहे. या स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असून येथे 132,000 लोकं बसण्याची क्षमता आहे. मात्र आता तामिळनाडूमध्ये या स्टेडियमपेक्षाही मोठं स्टेडियम उभारण्यात येणार आहे.
तामिळनाडू सरकारनं कोईम्बतूरमध्ये भारतातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधण्याची योजना आखली आहे.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमनंतर तामिळनाडूतील हे दुसरं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. स्टेडियम परिसरात क्रिकेटच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी हा उपक्रम आहे. राज्याचे उद्योगमंत्री टीआरबी राजा आणि युवक कल्याण व क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी या प्रकल्पाला उभारी दिली आहे.
हे स्टेडियम राष्ट्रीय महामार्ग 544 वर कोईम्बतूर शहरापासून सुमारे 16 किमी अंतरावर बांधण्यात येईल. स्टेडियममध्ये व्हीआयपी आणि कॉर्पोरेट सुविधा, खेळाडूंसाठी लाउंज, मीडिया सेंटर, सार्वजनिक कॅफेटेरिया, रेस्टॉरंट्स आणि क्रिकेट संग्रहालय यासह अत्याधुनिक सुविधा असतील.
हे स्टेडियम तयार करण्यासाठी चेन्नईचं एमए चिदंबरम स्टेडियम तसेच बेंगळुरूचं एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमकडून प्रेरणा घेतली जाईल. आता या स्टेडियमचं बांधकाम कधी सुरू होतं आणि ते कधी पूर्ण होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
चेन्नईचं एमए चिदंबरम स्टेडियम, जे ‘चेपॉक’ या नावानं देखील ओळखलं जातं, हे भारतातील सर्वात जुनं क्रिकेट स्टेडियम आहे. हे स्टेडियम 1916 मध्ये बांधण्यात आलं होतं. 1934 मध्ये येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. हा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. इंग्लंडनं हा सामना 202 धावांनी जिंकला होता. चेन्नईच्या या स्टेडियममध्ये सुमारे 50,000 लोकं बसण्याची क्षमता आहे.