वाटपाची यंत्रणाच कोलमडली! 3 दिवसांपासून महिला मुक्कामी; बांधकाम कामगारांसाठी विभागाकडून कुठलीही व्यवस्था नाही

0
40

अमळनेर = तालुक्यातील मंगरूळ येथे बांधकाम मजुरांना देण्यात येणारी भांडी वाटप योजनेत मोठा गोंधळ उडाला. गेल्या तीन दिवसांपासून लाभार्थी महिला व बांधकाम मजूर भांडी घेण्यासाठी येथे येऊन थांबली आहेत.

मात्र, संबंधित शासकीय यंत्रणेकडून त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात न आल्याने संतप्त मजूर महिलांना रास्ता रोको आंदोलन करीत नाराजी व्यक्त केला.

तालुक्यातील मंगरूळ येथे शासकीय योजनेतील भांडी घेण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील लोकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची वाटप यंत्रणाच कोलमडली आहे. ठेकेदार सकाळी अकराला येतात मात्र, दुपारी दोननंतर शटर बंद करून निघून जातात, अशी तक्रार महिलांनी केली आहे. भांडी मर्यादित व घेणाऱ्यांची संख्या जास्त झाल्याने लोकांची एकच झुंबड उडत असून झटापटीदेखील होत आहेत.

त्यावर मात्र, कोणाचे नियंत्रण नाही, अशी परिस्थिती आहे. या कामासाठी समाजकल्याण विभागाकडून पुरवठादार नेमले गेले आहेत. परंतु, त्यांनी लाभार्थ्यांसाठी कुठलीही सोय केलेली नाही. या ठिकाणी प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही तसेच किती दिवस थांबावे लागेल, याचीदेखील शास्वती दिली जात नाही. जिल्ह्यातील अनेक गावांतील लोकांना एकाचवेळी बोलविल्याने मोठी गर्दी झाली आहे.

अनेक लाभार्थी हे रात्री मुक्कामाला तेथेच थांबत असून, झोपायला जागा नसल्याने अंधारात जंगलात झोपावे लागत आहे. विंचू, साप, विषारी कीटकांची भीती आहे. सकाळी पुन्हा लावलेले नंबर उलट सुलट तर होतात आणि त्यावर महिलांमध्येदेखील वाद होत आहेत. काही महिलांसोबत लहान मुलेदेखील आली आहेत, तर त्यांच्या घरी सांभाळणारे कोणी नाहीत, त्यामुळे त्या मुलांचे व त्यांच्या कुटुंबांचेदेखील हाल होत आहेत.

जिल्हाधिकारी यांना दिली माहिती!

मंगळरूळ येथे बुधवारी (ता.१८) रात्री उशिरा डॉ. अनिल शिंदे यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ कॉलवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अमळनेरचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे यांना गोंधळाची परिस्थिती कळवली. प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला वाटप यंत्रणा, पाण्याची व्यवस्था व इतर नियोजन तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

लाभार्थ्यांचा रास्ता रोको!

अमळनेर-धुळे मार्गावर बांधकाम मजुरांनी गुुरुवारी (ता.१९) सकाळी अकराला मंगरूळ येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची पंचाईत झाली. त्यानंतर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी संबंधित पुरवठादाराला सूचना केल्या. संबंधित विभागालादेखील व्यवस्था ठेवण्यासाठी सांगितले. मागील सहा महिन्यांपूर्वीदेखील अशीच घटना घडली होती. त्यावेळी महिलांनी तहसीलदार यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन पुकारले होते.

Spread the love