मुख्यमंत्री शिंदेंना कुणी केलं ब्लॅकमेल? मंत्रिपद मिळाले नाही तर बायको आत्महत्या करेल,

0
49

मुंबई -: शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा खळबळजनक गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विशेषकरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

आमदाराच्या धमकीमुळे मंत्रिपद मिळाले नसल्याचा दावा शिवसेना नेते भरतशेठ गोगावले यांनी केला. काही आमदारांनी ‘मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल’ असं म्हणत ब्लॅकमेल केल्याचाही गोगावले यांनी दावा केला.

‘तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो’, असं म्हणत आमच्याच एका आमदाराने धमकी दिली, त्यामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही आणि आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. अंबरनाथमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात शिवसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांच्यावर गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधला.

भरतशेठ गोगावलेंचा दावा काय ? काय म्हणाले ?

मख्यमंत्र्यांनी मला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं असून त्यात मी समाधानी आहे. मी कधीही काहीही मागितलं नाही. मात्र ज्या वेळेस मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने ‘तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल, तर मी लगेच राजीनामा देतो’, असं म्हटलं आणि त्यामुळे मला मंत्रिपद सोडावं लागलं. आज त्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्ष केलं आहे, असं आमदार भरत गोगावले म्हणाले. सिडकोचे अध्यक्ष झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर यावेळी गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधला. तर मला आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना दोघांनाही मंत्रिपद मिळणार होतं, मात्र आम्ही मोठा त्याग केला आहे.

‘एक आमदार तर म्हणाले की मला मंत्रिपद मिळालं नाही, तर माझी बायको आत्महत्या करेल, मग आमच्या बायकांनी काय करावं?’ असंही भरत गोगावले भाषणात म्हणाले. तसंच त्या आमदारासाठी आम्ही मंत्रीपद सोडलं, कारण कुणाचं घरदार उध्वस्त व्हायला नको, असंही भरत गोगावले म्हणाले. गोगावले हे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित महाड पोलादपूर माणगाव वासियांच्या संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी बोलताना आपल्या भाषणात त्यांनी हे गौप्यस्फोट केले. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Spread the love