धुळ्यातील कुटुंबाची सामूहिक आत्महत्या नव्हे हत्याकांड! एकाच दोरखंडाने गळे आवळले,

0
49

धुळे : धुळे शहरातील देवपूर भागात समर्थ नगरात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यू प्रकरणात स्थानिक रहिवासी, नातेवाईक आणि दुकानातील कर्मचाऱ्यांसह २५ ते ३० जणांचे जाब जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.

मात्र गिरासे कुटुंबाच्या घरावर दरोडा पडल्याच्या प्रकारास पृष्टी मिळालेली नाही. या प्रकरणावर मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चाना सूत्रांनी कुठलाही दुजोरा दिलेला नाही. आजवरच्या तपासातून ही सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचे समोर येत आहे.धुळे शहरातील नं. ६ मध्ये राहणारे कामधेनू अॅग्रो (फर्टीलायझर) चे संचालक प्रवीणसिंग मानसिंग गिरासे, दीपांजली प्रवीणसिंग गिरासे, मितेश प्रवीणसिंग गिरासे आणि सोहम प्रवीणसिंग गिरासे या चौघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दि. १९ सप्टेंबरला संशयास्पदरित्या घरात आढळून आले होते. या घटनेमुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. विविध तर्क-वितर्क या घटनेसंदर्भात लावले जात आहेत.

यावर सुरु असलेल्या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण पोलीस सूत्रांकडून मिळाले आहे. परंतु, चौघांचा मृत्यू हा विषप्रयोगाने नाहीतर एकाच दोरखंडाने गळा आवळल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. दीपांजली, मितेश व सोहम यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असून, प्रवीणसिंग यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे नमूद केले आहे.तिघांचा मृतदेह बेडवर तर प्रवीणसिंग यांचा मृतदेह दोरीने लटकलेल्या अवस्थेत घटनास्थळावर आढळला होता. यावरून प्रवीणसिंग  यांनीच पत्नी व दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेतलेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

गिरासे कुटुंबियांच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. आतापर्यंत स्थानिक रहिवासी, नातेवाईक आणि दुकानातील कर्मचाऱ्यांसह २५ ते ३० जणांचे जाब जबाब नोंदविले आहेत. या प्रकरणाशी संबंधित अधिक पुरावे संकलित केले जात आहेत.गिरासे कुटुंबातील पती, पत्नी आणि दोन्ही मुलांच्या गूढ मृत्यूच्या घटनेचा पश्चिम देवपूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. चौघांच्या मृत्यू मागील खरे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच त्यात पोलिसांना यश मिळेल, असे स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सांगितले आहे.

Spread the love