अंबरनाथ -: येथील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे ४० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुद्देमाल, टोळीतील म्होरक्या देवीदास वाघमारे, दत्तात्रय पवार यांच्यासह आठ जणांना गजाआड केले.
मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.
या पूर्वीही केली अनेकांची फसवणूक,
पवार यांनी मुंबई पालिकेत अग्निशमन दलात नोकरभरतीमध्ये अनेक तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आठ ते दहा लाख याप्रमाणे दोन कोटी ७५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. उमेदवारांचे घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांनी शेळके यांच्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला होता.
अपहरणकर्त्यांनी मागणी केल्याप्रमाणे पैसे पाठवल्यानंतर कारच्या पाठोपाठ पोलीस पाठलाग करत होते. मात्र अपहरणकर्त्यांना ‘पोलीस असल्याचा संशय आल्याने मुलगा काही वेळात परत येईल’, असे सांगितले आणि मोबाइल बंद केला. त्यातील अपहरणकर्ते खंडणीची रक्कम न घेताच निघून गेल्याने घटनेचे गांभीर्य वाढले. याचवेळी अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या मोबाइल नंबरचा तांत्रिक तपास केला. लोकेशन भिवंडीजवळील पिसे डॅमजवळ असल्याचे आढळले. निखिल लबाना याला ताब्यात घेऊन विचारणा केली. त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आणि अपहरण प्रकरणातील दहा जणांना अटक केली आहे.