नोकरी टिकविण्यासाठी मागितली १० हजाराची लाच, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

0
45

जळगाव – शैक्षणिक संस्थेत नोकरी टिकवायची असेल तर प्रत्येक शिपाईला १० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा नोकरीकाळात त्रास होईल अशी धमकी देऊन लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे नागरी एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कुल, पारोळा येथे २०११ पासून शिपाई पदावर कार्यरत आहे. संस्थेचे चेअरमन मिलींद मिसर यांचे भाऊ गौतम मिसर हे संस्थेच्या बॉईज हायस्कुलमध्ये उपशिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाली आहे. गौतम मिसर यांनी संस्थेत कार्यरत असलेल्या तक्रारदार यांच्यासह सर्व शिपायांना त्यांच्याकडे बोलावुन घेतले. त्या सर्वांना संस्थेच्या चेअरमन पदावर त्यांचे भाऊ मिलींद मिसर यांची नियुक्ती झाली आहे. संस्थेत नोकऱ्या टिकवायच्या असतील तर प्रत्येक शिपायास प्रत्येकी १० हजार रूपये जमा करावे लागतील. अन्यथा तुम्हाला नोकरीत त्रास होईल, असे सांगितले होते. मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या मागणीप्रमाणे तकारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयाकडे ९ फेब्रुवारी २०२४ रोजी तकार केली होती. तकारीची पडताळणी दरम्यान संशयित आरोपी मुख्याध्यापक मिसर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपये लाचेची मागणी करुन शाळेतील उपशिक्षक सचिन पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. तसेच १२ फेब्रुवारी रोजी सापळा रचून कार्यवाही दरम्यान मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी लाचेची रक्कम शाळेतील उपशिक्षक धर्मेंद्र शिरोडे यांच्याकडे देण्यास सांगितले. परंतु तक्रारदार यांना मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या सांगण्याप्रमाणे इतरांकडे लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने कार्यवाही स्थगित केली होती.मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी १० हजार रूपये लाचेची मागणी केली. म्हणून त्यांच्याविरुध्द पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

Spread the love