एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या आणि एमबीबीएसला जाण्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार आहे.
तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. नॅशन मेडिकल कमिशनने २०२३-२४ च्या सर्व एमबीबीएस विद्यार्थ्यांना फॅमिली एडॉप्शन प्रोग्रॅम लागू केला आहे.
११ जून ते ७ ऑगस्ट या काळात २८ राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांत हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आले होते. यामध्ये देशातील ४९६ मेडिकल कॉलेजच्या ८५ टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यानंतर एनएमसीने एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये लोकांना मोठ्या संख्येने बीपी, शुगर, रक्तात लोहाची कमतरता आदी आजार समोर आले आहेत. महत्वाचे म्हणजे या लोकांना याची माहितीच नव्हती.
हा अहवाल एनएमसीच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा व्ही. वणीकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला आहे. वर्गात शिकवण्यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास क्रमाच्या पहिल्या वर्षापासून लोकांची आरोग्य तपासणी करण्याची संधी देण्यात आली आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येईल, असे वणीकर यांनी म्हटले आहे.
एमबीबीएसला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने पहिल्या वर्षापासूनच कुटुंब दत्तक घेण्यास सुरुवात करावी. कम्युनिटी आउटरीच कार्यक्रमांतर्गत किती कुटुंबांना मदत झाली हे देखील त्या कुटुंबाला भेट देऊन पाहिले जाणार आहे. महाविद्यालयांनी ग्रामीण भागातही कॅम्प आयोजित केले आहेत, असे त्यांनी सांगितले.