चेन्नई : तामिळनाडुत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मुलगा उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री केलं. शनिवारी रात्री उशिरा मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा करण्यात आली. आज रविवारी दुपारी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळ फेरबदलात स्टॅलिन यांनी एका अशा नेत्यालाही संधी दिलीय जो दोनच दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला आहे. सेंथिल बालाजी असं नेत्याचं नाव आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलात सेंथिल बालाजी यांच्याशिवाय द्रमुकच्या तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. गोवी चेझियान, थिरू आर राजेंद्रन आणि थिरू एस. एम. नासर या तिघांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. तर उदयनिधी हे दोनच वर्षांपूर्वी पहिल्यांदा आमदार झाले. पहिल्याच टर्ममध्ये त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यानंतर आता थेट उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी देण्यात आलीय.
फेब्रुवारी महिन्यात सेंथिल बालाजी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. गेल्या वर्षी सेंथिल बालाजी यांना ईडीने अटक केली होती. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांना मंत्रिपद दिलं गेलं. तर स्टॅलिन यांचे सुपूत्र उदयनिधी यांच्याकडे सध्या युवक कल्याण आणि क्रीडा विकास खात्याचा भार होता.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी द्रमुकचा जोरदार प्रचार केला. तामिळनाडुत द्रमुकच्या यशाचं श्रेय उदयनिधी यांना दिलं जातं. त्यांच्या लोकसभेच्या कामगिरीसाठीच उपमुख्यमंत्रीपद दिलं असल्याचं म्हटलं जात आहे. तामिळनाडुत २०२६ ला पुढची विधानसभा निवडणूक होणार आहेत.