पुणे सीबीआय पथकाची कारवाई; पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्यास लाच घेतांना अटक !

0
30

जळगाव -: लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून अशातच जळगाव येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकारी रमण वामन पवार (वय ५८, रा. शनिपेठ, जळगाव) यास २५ हजारांची लाच घेताना पुणे सीबीआयने अटक केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

वडिलांच्या नावे असलेल्या फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी संशयीताने २५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. या फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली. लेखा परीक्षण करण्यात आले. मात्र अहवाल देण्यात आला नाही. विचारणा केल्यानंतर पवारांनी त्यात त्रृटींवर बोट दाखवले.

फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी ५० हजारांची लाच मागून २५ हजारांवर तडजोड ठरली. तक्रारदार यांनी पुण्यात सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानंतर जळगाव येथे रमण पवार यांना तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती.

Spread the love