“बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार”; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख

0
47

मुंबई -: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानसोबतचे वैर संपण्याचे नाव घेत नाहीये. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या जवळचे होते आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी त्यांची घट्ट मैत्री होती. दरम्यान, आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या सहा दिवसांनंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सॲप मेसेजद्वारे देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे.

सलमान खानला धमकी देणाऱ्याने ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट होईल, असे सांगितले. मुंबई पोलीस मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. सलमानचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या झाली होती. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवारी मुंबई पोलिसांनी सलमानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरयाणातील पानिपत येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुख्खा असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तो बिष्णोई टोळीचा शार्प शूटर असून त्याला नवी मुंबईत आणण्यात आले आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. मुंबई पोलिस आणि हरयाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुख्खाला पानिपत येथून अटक करण्यात आली. २०२२ मध्ये, लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांच्या सांगण्यावरून सुख्खाने सलमान खानच्या मुंबईतील पनवेल फार्महाऊसची रेकी केली होती. रेकीनंतर सुखाला सलमानवर हल्ला करायचा होता, पण त्याचा प्लॅन फसला.

दरम्यान, गेल्या शनिवारी सलमान खानचे जवळचा सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा नेते बाबा सिद्दीकी हे मुलगा झीशानच्या कार्यालयातून बाहेर पडला होते. त्यानंतर त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्दीकींच्या पोटात दोन आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे रात्री ११.२७ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती.

 

Spread the love