जळगाव जिल्ह्यात नाकाबंदीच्या कारवाईत 1 कोटी 58 लाखाची रक्कम जप्त

0
80

जळगाव – : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस पथकाने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस पथकाने ऑपरेशन ऑल आउट, कोंबींग आणि नाकाबंदीच्या अनुषंगाने मंगळवारी (दि.22) रोजी उशिरापर्यंत नाकाबंदी करण्यात आली.

यामध्ये 1 कोटी 58 लाखाची रोकड, 6 लाख 13 हजार रुपयाचे मद्य आणि 3 लाख 10 हजार अमली पदार्थ असा एकूण तब्बल 1 कोटी 90 लाख 65 हजार 412 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठी येथे नाकाबंदी करून एका वाहनामधून 7 लाख 22 हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त केली.

या ठिकाणावर करण्यात आली कारवाई

कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरकांडे फाट्याजवळ नाकाबंदीमध्ये तब्बल 1 कोटी 45 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारोळा चौफुली येथे वाहनांची तपासणी दरम्यान 2 लाख 49 हजार रुपये जप्त केले आहेत.

जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी नाकाबंदी येथे एका व्यक्तीच्या ताब्यातून 1 लाख 46 हजार 120 जप्त केले आहे.

भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरड फाटा येथे एसएसटी पथकाने कारवाई करत एका व्यक्तीकडून ऑटोमेशन पिस्टल, सोबत 18 प्लास्टिक बुच आणि 30 छर्रे आणि वाहन जप्त केले.

दारूबंदीच्या कारवाईमध्ये चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाटेश्वर मंदिराजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या 2 जणांकडून 7 किलो 360 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

भगूर गावाजवळ 3 किलो 130 ग्रॅम वजनाचा 62 हजार 600 रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरंगा चौकात दुचाकीवरून 2 किलो 710 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.

जळगाव शहरातील वावडदा नाक्याजवळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत 6 लाख 13 हजार 992 रुपये किमतीचे देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.

एकूण पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 कोटी 58 लाख 17 हजार 620 रूपयांची रोकड, 6 लाख 13 हजार 992 रूपयांची देशी विदेशी दारू आणि 3 लाख 10 हजार 800 रूपयांचे अमली पदार्थ आणि वाहने असा एकूण 1 कोटी 90 लाख 65 हजार 412 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

Spread the love