जळगाव -: दुचाकीवरुन आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणावर गोळीबार करीत दोन दुचाकींची दगड टाकून तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास वाघ नगर स्टॉपजवळ घडली. गोळीबार आणि तोडफोड केल्यानंतर टोळके तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळतच रामानंद नगरचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाघ नगर स्टॉप परिसरात अक्षय सिताराम तायडे (वय २६ समतानगर) व अक्षय सुरेश लोखंडे (वयः २१ समतानगर) हे दोन तरुण दुचाकी लावून उभे होते. दरम्यान, रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी टोळक्याने तरुणावर गोळीबार केला. यात अक्षय तायडे या तरुणाच्या पायाला गोळी चाटून गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला. तर अक्षय लोखंडे या तरूणाला धारदार शस्त्र लागले आहे. त्यानंतर टोळक्याने त्या तरुणांच्या दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी तेथील दगड उचलून दुचाकीवर टाकून त्यांचे नुकसान झाले.
यामध्ये (एमएच १९, बीडी ८६२४) व (पूएच १९, ईडी ८८७९) क्रमांकाच्या दुचाकींची नुकसान झाले. या घटनमुळे परिसरात खळबळ माजून गेली होती. वाघ नगर परिसरात टोळक्याने दुचाकीची तोडफोड करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.