प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – : सध्या दिवाळी चा सण सुरू असल्याने फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळत आहे मात्र आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडतात असाच प्रकार येथून जवळच असलेल्या वराडसिम येथे घडला असून खळ्याला आग लागल्याने शेती अवजारांसह गुरांचा चारा खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की , वराडसिम येथील तळे भागात कुऱ्हा पानाचे रस्त्यावर असलेल्या तुकाराम वाणी व गजानन वाणी यांचे खळे आहेत तसेच या खळ्यांना लागून काही अंतरावर मोबाईल टावर आहेत. दि.३१ आँक्टोबर रोजी संध्याकाळी ७:३० ते ८ वाजेच्या दरम्यान तुकाराम वाणी यांच्या खळ्यातून धुराचे लोट निघत असल्याचे समजताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र अचानक आगीने रौद्ररुप धारण केले यात गुरांसाठी असलेला चारा तसेच शेतीची अवजारे व पत्रांचे शेड जळाले.या बाबत ग्रामस्थांनी भुसावळ येथील पदाधिकाऱ्यांना व पोलीसांना माहिती दिल्याने भुसावळ येथील अग्नीशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी जवळच बांधलेली बैलजोडी बचावल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलीस पाटील ,कोतवाल तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले तसेच नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असल्याचे सांगितले आहे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी होत असून फटाके फोडताना काळजी घ्यावी व कोणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे पोलीसांनी आवाहन केले असून आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील मदत करणाऱ्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक केले जाते आहे.