राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण…; CM एकनाथ शिंदेंचा दावा

0
32

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवत आहे.

त्यात या मतदारसंघात महायुतीकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र माहिमच्या या जागेवरून मनसे आणि शिवसेनेत बिनसलं. परंतु अमित ठाकरेंसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून भांडुप मतदारसंघाची ऑफर देण्यात आली होती. परंतु मनसेने त्यावर प्रतिसाद दिला नाही असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

 

एका मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनसे-शिवसेनेतील वादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, भांडुप मतदारसंघाबाबत मनसेचं आमच्याशी बोलणं झालं होते. शिवडी मतदारसंघात आम्ही बाळा नांदगावकरांविरोधात उमेदवार दिला नाही. मनसेने अमित ठाकरे भांडुपमधून निवडणूक लढतील असं सांगितले. आम्ही ते विचारात घेतले. मी मनसेशी बोललो, तुमचं विधानसभेचं नियोजन काय हे विचारले होते. पण त्यांनी मला सांगितले, तुम्ही आधी महायुतीचं ठरवा, त्यानंतर आपण बघूया असा दावा शिंदेकडून करण्यात आला.

त्यानंतर मनसेने त्यांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली तेव्हा मी सदा सरवणकरांशी बोललो. जर या मतदारसंघात थेट लढत झाली तर माहिम मधून अमित ठाकरे विजयी होऊ शकत नाहीत. तिरंगी लढतीत दोघांपैकी कुणीही विजयी होईल त्यात अमित ठाकरे जिंकण्याची शक्यता आहे असं सदा सरवणकरांनी मला सांगितले. त्यावर मी सरवणकरांना राज ठाकरेंना भेटण्यास सांगितले परंतु राज यांनी सरवणकरांना भेटणे टाळले असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

माहिममध्ये काकाची पुतण्याला छुपी मदत?

माहिम मतदारसंघात सदा सरवणकर माघार घेणार अशी चर्चा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. मात्र सरवणकरांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या निवडणूक प्रचार दौऱ्याचं वेळापत्रक समोर आले आहे. माहिम मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला असला तरी प्रचारात माहिम मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यापैकी कुणाचीही सभा किंवा रॅली नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे माहिम मतदारसंघात उद्धव ठाकरेंची पुतण्या अमित ठाकरेंना छुपी मदत आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Spread the love