जळगाव -: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी केली जात आहे. नाकाबंदीत तहसील कार्यालयाच्या परिसरातील वाहनांची तपासणी करण्यात आली. या वेळी दोन वाहनांमधून दोन लाख २३ हजारांची रोकड, तर बहिणाबाई चौकात ८५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
पोलिस निरीक्षक अनिल भवारे व कल्याणी वर्मा, उपनिरीक्षक महेश घायतड, राजू जाधव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी केली.
तहसील कार्यालय परिसरातून जात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारची तपासणी केली असता, कुकरेजा नामक व्यक्तीकडून एक लाख ८८ हजार रुपये, तर सायंकाळी जोहर खाटीक (रा. मेहरुण) यांच्या कारची तपासणी केली. त्यांच्या खिशातून एक लाख ३५ हजारांची रोकड जप्त केली. ती वाहने आणि रोकड निवडणूक विभागाचे एसएसटी पथकाकडे जमा करण्यात आली.
बहिणाबाई चौकात ८५ हजारांची रोकड
शहरातील बहिणाबाई चौकात जिल्हापेठ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या वेळी स्वातंत्र्य चौकाकडून अग्रवाल चौफुलीकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. कारमधील एका इसमाकडे ८५ हजारांची रोकड मिळून आली. ती रोकड जप्त करण्यात आली आहे.