पत्रकाराला मारहाण भोवली, आमदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0
26

जळगाव -: पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरणी पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल होत असल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दि. २९ जुले २०२३ रोजी एक बालिका बेपत्ता झाली होती. त्यानंतर त्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना दि. ०१ ऑगस्ट २०२३ रोजी उघडकीस आली. गुन्ह्यातील आरोपी स्वप्निल पाटील यास अटक करण्यात आली. सदर आरोपीस कडक शासन व्हावे यासाठी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व अँड. उज्वल निकम यांची सरकार पक्षातर्फे नियुक्ती होण्यासाठी दि.०४ ऑगस्ट रोजी सर्व पक्षीयांनी भडगाव तहसिल कार्यालयावरमुक मोर्चा काढला. नातेवाईकांच्या व मुक मोर्चाच्या मागणीबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने पत्रकार संदीप महाजन यांनी याबाबत बातमी प्रसारीत केली. बातमीच्या शिर्षकामध्ये मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी या शब्दाचा राग येवून आमदार किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना त्याच रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अश्लिल शिवीगाळ केली. त्यानतर दि. ०९ ऑगस्ट २०२३ रोजी पत्रकार संदीप महाजन यांना मारहाणही करण्यात आली होती.

याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु होता. त्यावर आमदार किशोर पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Spread the love